पुणे, ४ फेब्रुवारी २०२३: महाराष्ट्रातील पुण्याजवळ जेजुरी महामार्गावर झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आज शनिवारी (ता. चार फेब्रुवारी) रात्री आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत आई-मुलगा आणि एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संकेत दिलीप डोके (वय २०), विजया दिलीप डोके (४०) आणि ओंकार चंद्रकांत डोके (२०) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जेजुरी महामार्गावर शिरूरजवळ शिक्रापूर पाबळजवळ हा अपघात झाला. या रस्त्यावर संकेत डोके हे आई व मित्रासह दुचाकीने (एमएच १४, एचआर ७०७३) धामारीहून शिक्रापूरकडे जात होते.
दरम्यान, शिक्रापूरकडून येणाऱ्या आयशर टेम्पोची (एमएच १४, जीयू ६८८०) आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. संकेत आणि विजया डोके हे पुणे जिल्ह्यातील खडकवाडी आणि ओंकार आंबेगाव येथील रहिवासी होते.
याप्रकरणी संपत चंदर डोके यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शिक्रापूर पोलिसांनी आयशर टेम्पोचालक अक्षय बबन साकोरे याच्यावर गुन्हा दाखल केला. अक्षय हा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांदोली राजगुरूनगर येथील रहिवासी आहे. पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करीत असून पुढील कारवाई सुरू आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड