पुणे, दि. ३ मे २०२०: सुक्या गवताचा पेंढा घेऊन जात असलेल्या एका टेम्पोला आग लागण्याची घटना उंड्री चौका पासून हडपसरला जात असताना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. स्थानिकांच्या मदतीने आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
हा टेम्पो उंड्री चौकातून हडपसरच्या दिशेने शेतातील सुका पेंडा घेऊन जात होता. पेंड्याचा भारा उंच असल्याने रस्त्यात असलेल्या विद्यूत तारांचा त्याला स्पर्श झाला. उच्च विद्युत प्रवाहाच्या तारा असल्यामुळे पेंड्याला आग लागली. आग लागताच धुराचा लोळ उठला त्यामुळे आग लागल्याचे लक्षात आले.
स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत लगेच अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर हजर होऊन स्थिती नियंत्रणात आणली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक रहिवाशांनी सुद्धा हातभार लावला सुदैवाने यात चालकाला कोणतीही इजा झाली नाही तसेच टेम्पोचेही नुकसान झाले नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी