लंडन, ७ सप्टेंबर २०२०: टेनिसचा दिग्गज नोवाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर पडला आहे. यूएस ओपनमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यादरम्यान एका महिला अधिकाऱ्याला नोवाक जोकोविच कडून फेकला गेलेला बॉल लागल्यामुळे त्याला या स्पर्धेला मुकावं लागलं आहे. अमेरिकन टेनिस असोसिएशननं (यूएसटीए) नोव्हाक जोकोविच स्पर्धेतून बाहेर पडल्याच्या प्रकरणाची एक निवेदन देऊन पुष्टी केली. ग्रँड स्लॅममध्ये असा नियम आहे की एखाद्या खेळाडूने एखाद्या अधिकाऱ्याला किंवा प्रेक्षकांना आपल्या कृतीतून दुखापत केली तर त्याला दंडासह अपात्र घोषित केलं जातं. सामना रेफरीनं जोकोविचला दोषी ठरवलं आहे.
पहिल्या सेटमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेला जोकोविच स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टा कडून ५-६ अंकांनी मागे राहिला होता, आपली होत असलेली ही पिछाडी पाहता त्यानं निराश होऊन हातातील चेंडु फिरवला. योगायोगानं हा चेंडू एका महिला अधिकाऱ्याच्या दिशेने गेला व तिच्या मानेवर जाऊन आदळला. चेंडू लागल्यानंतर ती महिला अधिकारी ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी तो तिच्याकडे गेला. यानंतर काही मिनिटातच ती महिला अधिकारी उठून टेनिस कोर्टच्या बाहेर निघून गेली.
जोकोविचने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट सामायिक केली आणि या घटनेचे दुःखद वर्णन केले आहे. यूएस ओपनच्या प्री-क्वार्टर सामन्यापर्यंत टेनिस दिग्गजांना जितकी रक्कम मिळेल, त्यातील काही रक्कम दंड म्हणून कमी केली जाते. १९९० मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये जॉन मॅकेनरॉ आणि २००० मध्ये फ्रेंच ओपन मध्ये स्टीफन कोबेक यांच्या नंतर जोकोविच ग्रँड स्लॅमच्या इतिहासातून बाहेर राहणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे