आज लागणार दहावीचा निकाल, कुठे मिळेल निकाल? वाचा सविस्तर माहिती

पुणे, १६ जुलै २०२१: राज्य मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवार १६ जुलै २०२१ रोजी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर पाहता येणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. यंदा कोरोनामुळं ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यामुळं निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे. सन २०२१ च्या दहावीच्या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. निकालाची प्रिंटही विद्यार्थ्यांना घेता येईल.

इयत्ता नववीचा अंतिम निकाल, इयत्ता दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा/अंतर्गत मूल्यमापन आदींच्या आधारे माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण दिले आहेत. त्यानुसार मंडळानं निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलीय.

ज्या विद्यार्थ्यांनी २०२१-२२ या वर्षीच्या परीक्षेसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केली होती, त्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही, असं मंडळानं कळवलं आहे. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नसल्याने या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील, असे मंडळानं स्पष्ट केलं आहे.

निकाल कुठं पाहणार?

सन २०२१ मध्ये इ.१० वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in किंवा http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

किती विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार?

एकूण आठ माध्यमानुसार सन २०२०-२१ वर्षातील एसएससी (इ. १० वी ) परीक्षेला एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी ९ लाख ०९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये इ.१० वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर केले जातील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे