मणिपूर, २२ डिसेंबर २०२२ मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात बुधवारी स्कूल बसाला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात स्कूलबस उलटून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात ४० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. मणिपूरची राजधानी इंफाळपासून ५५ किमी अंतरावर लोंगसाई भागाजवळ ओल्ड कछार रोडवर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, थम्बलानू हायर सेकंडरी विद्यालयातील विद्यार्थी दोन बसमधून नोनी जिल्ह्यातील खौपुम येथे वार्षिक शालेय अभ्यास दौऱ्यावर गेले होते. विद्यार्थिनी ज्या बसमधून प्रवास करत होत्या, ती बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली आणि हा अपघात झाला.
मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणाले,
या अपघातावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले की, आज ओल्ड कछार रोडवर शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसच्या अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झाले. बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी एसडीआरएफ, वैद्यकीय पथक आणि आमदार घटनास्थळी पोहोचून जखमी विद्यार्थ्यांना राज्याच्या राजधानीत उपचारासाठी नेण्यात आले आहे. तसेच या अपघातात मृत झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा केली.
दरम्यान, मणिपूर स्कूल बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) देण्यात येणार आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.