गोल पोस्ट Maharashtra News कात्रजजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरची ट्रक-कारला धडक, दोन जखमी

कात्रजजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरची ट्रक-कारला धडक, दोन जखमी

पुणे ५ मार्च २०२६ : पुण्यातील जांभूळवाडी दरीपूलच्या अगोदर आणि नवीन कात्रज बोगद्याजवळ गुरुवारी भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका टँकरने समोरील वाहनांना जोरदार धडक दिल्याने तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि मदत पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या घटनेबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक (PI) शरद झिने यांनी सांगितले की, “या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका टँकरने समोरील दोन ट्रकना धडक दिली. त्यापैकी एका ट्रकखाली एक ॲमेझ कार अडकली. धडक देणाऱ्या ट्रकचा चालक आणि ॲमेझ कारचा चालक जखमी झाले असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टँकरवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. धडकेमुळे दोन वाहने पलटी झाली. त्यापैकी एक ट्रक पलटी झाल्यानंतर त्याखाली ॲमेझ कार अडकली. हा अपघात जांभूळवाडी दरीपूलच्या अगोदर घडला.” दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : दिनेश वढणे

error: Content is protected !!
Exit mobile version