गोल पोस्ट Maharashtra News सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे ६ मार्च २०२६: पुण्यातील माजी नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

२५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत काही वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले.

तक्रारीनुसार, वसंत मोरे यांनी “लहाडे इतका दारू पिला होता की त्याला बोलताही येत नव्हते, ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत आहे” असे वक्तव्य केले. तसेच हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही फिर्यादींनी केला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे आपली सामाजिक बदनामी झाली असून, कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सध्या कुटुंबीय भीतीच्या आणि तणावाच्या वातावरणात असल्याचेही फिर्यादींनी पोलिसांना सांगितले आहे.

या तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनीधी: दिनेश वढणे

error: Content is protected !!
Exit mobile version