ठाकरे सरकार जप्त करणार पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता… 


मुंबई, २० सप्टेंबर २०२०: ठाकरे सरकारनं पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतलाय. या मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मंत्री सतेज पाटील यांनी दिलीय. त्यामुळं आता पीएमसी बँक घोटाळ्यातील रक्कम वसुलीसाठी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करुन खातेदारांची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी केली होती. या तक्रारीला उत्तर देतानाच सतेज पाटील यांनी आरोपींच्या मालमत्ता विकून आर्थिक वसूली केली जाणार असल्याची माहिती दिलीय. यावर राज्य सरकारनं मालमत्ता जप्त करुन लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याचं पत्र गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तक्रारदारांना लेखी पत्राद्वारे दिलं.

काय म्हंटलंय पत्रात

या पत्रात म्हटलं आहे, “पीएमसी बँक आणि एचडीआयएल कार्यालयाचा मुख्य सर्वर तपासासाठी ताब्यात घेण्यात आलाय. तो विश्लेषणासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा कलिना येथे पाठवण्यात आला आहे. विविध पीएमसी बँकेचे ४३ खातेधारक ज्यांचे पीएमसी बँकेत ठेवी आहेत, परंतु ते पैसे न काढू शकल्यानं त्यांना त्रास झाला आहे. त्यांचे जबाब नोंदवून त्यांचा उपयोग गुन्ह्यात पुरावा म्हणून करण्यात आलेला आहे.”

“पीएमसी बँकेनं बनावट कागदपत्रं बनवलीत. यासोबतच एचडीआयएल कंपनी’नं ज्या खात्यांवर कर्ज घेतलं आहे त्यांची कागदपत्रं देखील तपासली जाणार आहेत. या कागदपत्रांच्या तपासणीसाठी बँक अधिकारी आणि कर्मचारी यांचेही जबाब नोंदवण्यात येतील. एचडीआयएल कंपनीची स्थावर मालमत्ता जीपीएमसी बँकेत गहाण ठेऊन त्यावर कर्ज काढण्यात आलं आहे. त्यांची पालघर, नायगाव, वसई, विरार येथील मालमत्ता आणि १४ वाहनं आणि २ प्रवासी यांच्यावर नियमान्वये कारवाई करण्यात आली आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा