मुंबई, १० ऑगस्ट २०२३ : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांच्यासह पक्षाच्या काही नेत्यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली. मुंबई महापालिका प्रकल्प, बीएमसीकडून केली जाणारी कामे, दिली जाणारी कंत्राटे, मुंबईकरांचे प्रश्न याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. महापालिकेत सॅनिटरी नॅपकिन मशीन खरेदी-विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनिल परब यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली.
बीएमसी मुख्यालयात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना केबिन दिल्यानंतर याला मोठा विरोध ठाकरे गटाने केला होता. याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर अनिल परब यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी पालकमंत्र्यांचा घोटाळा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनिल परब आणि इतर ठाकरे गटाच्या नेत्यांच्यात नेमके काय चालू आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अधिवेशनाच्या काळात मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारा संदर्भात काही गोष्टी मी सभागृहात मांडल्या होत्या. तत्कालीन मंत्र्यांनी मला या मुंबईमधून पालिकेच्या प्रशासनासंदर्भात चुकीची माहिती दिली होती. त्यामुळे मी या संदर्भात हक्क भंग मांडला होता. चुकीची माहिती दिल्यामुळे हा हक्क भंग मी मांडला होता. आयुक्तांनी मला आज वेळ दिला. यावेळी मी विधान परिषदेत मांडलेले मुद्दे आजच्या बैठकीत मांडले, असे अनिल परब यांनी सांगितले.
सॅनिटरी नॅपकिन मशीन घोटाळ्यासंदर्भात सगळी वस्तुस्थिती मांडली. या मशीनच्या किंमती आणि त्याचे कार्य यावर चर्चा झाली. मुंबई महापालिकेने मला आश्वासित केले आहे की, ५००० मशीनचे कॉन्ट्रॅक्ट होते. त्यातील फक्त २०० मशीन आम्ही प्रायोगिक तत्त्वावर घेऊन पायलट प्रोजेक्ट करू. यामध्ये फीडबॅक चांगला आला तरच हा प्रोजेक्ट आम्ही पुढे घेऊन जाऊ, असे बीएमसी कडून सांगण्यात आले आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.
दुसरा विषय म्हणजे एका ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला दुसऱ्या टेंडरमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. त्या टेंडरमध्ये सुद्धा खोटी कागदपत्रे या कंपनीकडून देण्यात आली होती. या संबंधित ब्लॅकलिस्ट कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई महापालिका काय पाठपुरावा करत आहे, या संदर्भात आम्ही विचारणा केली. ही कंपनी आता कायमची ब्लॅक लिस्ट झाली आहे, असे अनिल परब म्हणाले.
पालकमंत्र्यांचा घोटाळा सुद्धा आम्ही लवकरच समोर मांडू, असा मोठा इशारा अनिल परब यांनी दिला. आम्ही तुम्हाला आवडो न आवडो लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे,असे परब म्हणाले. मुंबई महापालिके संदर्भात इतर प्रश्न माजी नगरसेवक आणि आमदारांना सोबत घेऊन पुढे आम्ही मांडणार आहोत. विधान परिषद आमदार असल्यामुळे माझ्याकडे तेरा हत्यार आहेत, ज्यातून मी जनतेचे प्रश्न मांडू शकतो. त्यामुळे मला भेट नाकारणे हे संविधानाची पायमल्ली करण्यासारखे आहे, असेही अनिल परब यावेळी म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर