निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाची दिल्ली हायकोर्टात धाव!

मुंबई, १० ऑक्टोबर २०२२: शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा वाद आता दिल्ली हायकोर्टात पोहचला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.

ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने आपल्या याचिकेत केली आहे. तसेच ही याचिका आजच तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. या याचिकेवर नेमका काय युक्तिवाद केला जातो आणि त्यानंतर नेमका निर्णय काय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यामुळे शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे पर्यायी इतर तीन चिन्ह सुचवून त्यापैकीच एक चिन्ह देण्याची मागणी केली आहे. यामध्ये मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशुळ या चिन्हांचा समावेश आहे. याशिवाय आपल्या गटाचे नाव हे १) शिवसेना बाळासाहेब ठाकरे २) शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि ३) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे मिळावे अशी मागणी आयोगाकडे केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा