मुंबई २५ जुलै, २०२२ : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, विरुद्ध शिंदे सेना हा वाद सुरुच आहे. इतके दिवस लोकांना न भेटणा-या उद्धव ठाकरेंनी आता लोकांना भेटायला सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी शिंदे सेनेवर आरोपांच्या फैरीच्या फैरी झाडल्या आहेत. हिंमत असेल तर बाळासाहेंबाचा फोटो न लावता, सभा घेऊन दाखवा. एवढचं नव्हे तर शिंदे सेना ही बंडखोर नाही, तर दरोडेखोर आहे. जी शिवसेनाच नाही तर माझे वडिलही पळवत आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. जे गेलेत, त्यात एकही सच्चा शिवसैनिक नाही. असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. ही केवळ शिवसेनेला संपवण्याची चाल नसून हिंदुत्वाला संपवण्याचा भाजपने घातलेला घाट आहे, म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडले नाही.
याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, आदरणीय बाळासाहेब ठाकरे आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत. त्यामुळे त्यांचे आशिर्वाद आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे वडिल पळवण्याचा प्रश्नच येत नाही. निवडणुकीच्या स्थगितीच्या प्रश्नावर प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
हे आरोप प्रत्यारोप उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात होत असताना, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात भाजप म्हणजेच केंद्र सरकार सरसावले आहे. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांच्या काळात झालेल्या सर्व प्रकल्पांचे केंद्र सरकारकडून ऑडिट होणार आहे. याचा अर्थ एक प्रकारे आदित्य ठाकरेंच्या सर्व गोष्टींचा पडताळा होणार आहे.
भाजप शिंदे सेना विरुदध ठाकरे असा हा संघर्ष आता पहायला मिळत आहे. मला वाढदिवसाच्या दिवशी शपथपत्र द्या, असं म्हणत उद्धव ठाकरे एक प्रकारे पुन्हा लोकांना गोळा करताना दिसत आहे. शिवसेनेला पडणारं भगदाड हे ठिगळं लावून बुजणारं नाही. पण आता प्रयत्नांती परमेश्वर म्हणत आदित्य ठाकरेंनी घेतलेली निर्धार यात्रा आणि उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेल्या सभा, भेटी यांना किती फळ येतंय, हे पहावं लागेल. यातूनच शिवसेनेचे भवितव्य समजेल, हे खरंच…
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस