ठाकरेंचं गणित बहुतेक कच्चं

मुंबई, २५ ऑक्टोंबर २०२२: राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर याची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे दौरा केला. त्यांनी ओल्या दुष्काळाचीही पाहणीही केली. घोषणांची अतिवृष्टी करणारे निर्दयी सरकार भावनाशून्य तर आहेच पण उत्सवीही आहे, जर या सरकारला पाझर फुटत नसेल तर आसूड घेऊन शेतकऱ्यांनीच त्यांना घाम फोडावा अशी टीका करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या हेक्टरी ५० हजार रुपये मदत मागणीच्या पाठिशी शिवसेना उभी राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले, तर या वर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी वूत्त्वाहिनी माध्यमांना बोलताना ठाकरेंच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. २५ हजार हेक्टरी मदत मागितल्याचं उद्धव ठाकरे विसरले आहेत, आत्ता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने जूनपासून जे जे शेतकऱ्यांवर संकट आलं, त्या प्रत्येकाचा पंचनामा करायला लावून प्रत्येकाची नुकसानभरपाई दिली. ती दुप्पट दिली. आता त्यांचं गणित बहुतेक कच्चं आहे. ते २५ हजार विसरले, आता ५० हजार रुपये म्हणत आहेत. ५० हजार काय, एक लाख रुपये द्यायला हवे होते. पण ते तुमच्या काळात का नाही दिले? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे..

तसेच औरंगाबादचा दौरा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यावरून सरकारला खडसावलं होतं. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत का मिळत नाही? असा सवाल करून त्यांनी निशाणा साधला होता. तर या टीकेला प्रश्नाला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांचा अभ्यास कमी आहे, त्यांना सोपी गोष्ट कळत नाही असा टोला लावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे, त्यांना माहित असायला पाहिजे की पाऊस थांबल्याशिवाय पंचनामे करता येत नाहीत. आणि पंचनामे केल्याशिवाय मदत देता येत नाही हे त्यांना माहिती असतं तर त्यांनी अशी टीका केली नसती, मला असं वाटतंय की, त्यांचा अभ्यास कमी आहे, असं रामदास कदम म्हणाले आहेत.

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली. येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमींवर हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. पण त्यांच्या दौऱ्यापूर्वी आणि नंतर शिंदे गट आणि भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सुरू केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा