ठाणे, दि. २४ जुलै २०२०: कोरोना हा मांस खाल्याने होतो असे सुरूवातीला समजलं जात होत मात्र शास्त्रज्ञांनी हा समज मोडीत काढला . अगदी तेव्हापासूनच नागरिकांनी मांस खाणं कमी केलं होतं त्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या मागणीत सातत्याने वाढ होत होती. मात्र आता श्रावण महिन्याला सुरूवात होताच भाज्यांची मागणी ही आणखी वाढली आहे आणि भाज्यांचे भाव हे आवाक्याबाहेर गेले आहेत. किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरांत २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर स्थिर असताना वाहतूक खर्च वाढल्याचे कारण देत किरकोळ विक्रेत्यांनी नफेखोरी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी खवय्यांनी गटारी साजरी केली आणि मंगळवारपासून श्रावण महिना सुरू झाल्याने अनेकांनी मासांहार सोडून शाकाहार अवलंबला. त्यामुळे भाजी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यमुळे भाजी कितीही महाग असली तरी ती खरेदी करणं हे आवश्यक आहे. किरकोळ बाजारात आठवडाभरापूर्वी ४० रुपये किलो असलेली भेंडी, फ्लॉवर, टोमॅटो आणि वांगी यांचे दर ६० रुपये किलो तर गवार, फरसबी, शिमला मिरची यांचे दर ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरी भागात स्थानिक शेतकरी मोठया प्रमाणावर भाजी विक्रीसाठी येत असतात. तसेच आदिवासी महिलाही रानभाज्या विक्रीसाठी शहरांमध्ये येत असतात. त्यामुळे त्याचा खर्च आणि नफा याचा हिशोब लावूनच भाज्यांच्या किंमती ठरवल्या जातात. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे