मुंबई, १२ जानेवारी २०२३ :सदा सरवणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यावेळी बंदुकीतून गोळी झाडण्यात आली होती. ही गोळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्याच बंदुकीत निघाली होती असा अहवाल बॅलेस्टिक तज्ज्ञांनी दिला आहे.
गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता. हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केल्याचा आरोप झाला होता. दरम्यान, आता बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती, ती सरवणकरांच्याच बंदुकीत सुटल्याचे म्हटले आहे. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, जप्त केलेली काडतूसे आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणींत भर पडली असून, पोलीस आता सदा सरवणकर यांच्याविरोधात काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण ?
गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.