उत्तर प्रदेश, दि. ७ मे २०२० : देशामध्ये कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच उत्तर प्रदेशमध्ये एक हृदय हेलवणारी घटना समोर आली आहे.
आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. यात अजून धक्कादायक बाब म्हणजे या महिला पोलीस कर्मचाऱ्याने चार दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला होता.
“एक लहान मुलगा आणि दुसरं पाच दिवसांच बाळ कुशीत असताना कोरोनाशी लढणारी कोरोना योद्धा माता आज आपल्यात नाही.” अशी भावना या मृत्यूबाबत मुख्य पोलीस अधिकारी रजनीश यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
याबाबत एक वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्तव्य बजावत असताना तिला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्या महिला कर्मचाऱ्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. मात्र अहवाल येण्या अगोदरच त्या पोलीस महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अहवाल आल्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
ही महिला पोलीस कर्मचारी कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर पोलीस ठाण्यात कार्यरत होती. प्रेग्नंट असल्याने ५ एप्रिलपर्यंत ती सुट्टीवर होती. याबाबत कुटुंबीयांनी दिलेली माहिती अशी की, महिला पोलीस कर्मचाऱ्याची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. मात्र दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली की, उत्तर प्रदेशात आतापर्यंत २९९८ लोक हे कोरोना बाधित आहेत. यामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे.
या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या जाण्याने पोलीस प्रशासनांकडून अत्यंत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: