नवी दिल्ली, ५ जुलै २०२३ : देशभरात अनेक ठिकाणी शेतकरी अजूनही आभाळाकडे नजरा लावून बसला आहे. यंदा अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील काही भागात पावसाने अजूनही दडी मारली आहे. तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. काही भागात अजूनही पेरणी ठप्प आहे. जुलै महिना आला तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. आता या योजनेतील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील शेतकऱ्यांना लवकर धनलाभ होणार आहे. या योजनेतील १४ वा हफ्ता १५ जुलै पूर्वी त्यांच्या खात्यात थेट जमा होईल. कोट्यवधी शेतकऱ्यांना त्यामुळे लाभ होईल.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत अनेक शेतकरी लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. या योजनेत आता मोठे बदल झाले आहेत. त्याचा थेट परिणाम देशातील ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांवर होईल. केंद्र सरकार लवकरच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत करणार आहे. पण त्यापूर्वी केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील बोगसगिरीला चाप घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना त्यांचे स्टेट्स पाहण्याची पद्धत पण पूर्णपणे बदलली आहे. याशिवाय केंद्र सरकार पीएम किसान मोबाईल ॲप घेऊन आली आहे. या मोबाईल ॲपमुळे अनेक बदल झाले आहेत. तक्रार करण्यापासून वेळोवेळी येणारे अपडेट्स लाभार्थ्यांना समजणार आहेत. लाभार्थ्यांना स्टेट्स बघण्यासाठी नोंदणी करणे आणि नोंदणी क्रमांकाचा वापर करणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील १३ हप्ते जमा केले आहेत. देशभरातील शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. १४ वा हप्ता कधी जमा होईल. याची त्यांना प्रतिक्षा लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार १५ जुलै पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा करणार आहे. या योजनेतील निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर