लडाखमध्ये आज भारत-चीन मध्ये होणार १६ वी चर्चा, भारत करू शकतो हा दबाव निर्माण

नवी दिल्ली, १७ जुलै २०२२: लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणावाच्या मुद्द्यावर रविवारी भारत आणि चीन पुन्हा एकदा वाटाघाटीच्या टेबलावर येतील. आज दोन्ही देशांदरम्यान कमांडर स्तरावरील बैठकीची १६वी फेरी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चुशुल मोल्डोमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे. भारतीय लष्कर आणि चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) यांच्यात शेवटची चर्चा ११ मार्च रोजी झाली.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दोन्ही देशांच्या आज झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत डेपसांग आणि डेमचोकमधील प्रश्न सोडवण्यासोबतच लवकरात लवकर सैन्य हटवण्यासाठी सर्व मुद्यांवरून दबाव आणला जाईल. अलीकडे, ७ जुलै रोजी बाली येथे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेतही हा मुद्दा ठळकपणे समोर आला होता.

G-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या बाजूला तासभर चाललेल्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी वांग यांना लडाखच्या मुद्द्याबद्दल सांगितले आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जावा असे सांगितले.

याशिवाय लडाखमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचा आग्रह परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की एस जयशंकर यांनी द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन करण्याचे सांगितले होते.

५ मे २०२० रोजी लडाखमधील पॅंगॉन्ग लेक परिसरात हिंसक चकमकीनंतर हा गोंधळ सुरू झाला. पॅंगॉन्ग सरोवरासह काही भागांतून लष्कराने माघार घेतली आहे, मात्र अजूनही दोन्ही देशांच्या लष्कराचे ५० ते ६० हजार सैनिक LAC वर तैनात आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा