स्टॉकहोम, ७ ऑक्टोबर, २०२२ : जगातला सर्वोच्च समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील कार्यासाठीचा नोबेल पुरस्कार यंदा फ्रेंच लेखिका ॲनी अर्नो यांना जाहीर झाला. त्यांनी फ्रान्समधील १९४०च्या दशकातील कष्टकरी स्त्रियांच्या अनुभवविश्वाचे निर्भीडपणे दर्शन घडविणारे लेखन केले. अर्नो यांनी आपल्या लेखनातून स्मृती, समाज, कुटुंब यातील काळोख्या, धूसर कोपऱ्यांवर प्रकाश टाकला आहे. पारितोषिकाची रक्कम दहा लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे नऊ लाख डॉलर) इतकी आहे.
अर्नो यांच्या लेखनातून त्यांनी लिंगभेद आणि वर्णभेद त्यातून व्यक्त होणारे प्रेम, लैंगिक जीवन आणि गर्भपात निंदा या विषयी जागरुकता निर्माण केली आहे. नोबेल पारितोषिकाची घोषणा करताना स्वीडिश ॲकॅडमीने म्हटले आहे, की वायव्य फ्रान्समधील नॉर्मंडी परिसरातील एखा छोट्याशा खेडेगावातून पुढे आलेल्या अर्नो यांना लेखनातील निर्भीडता आणि कमालीची अचूकता यासाठी सन्मानित करण्यात येत आहे.
या पारितोषिकाच्या जाहीरतेनंतर अर्नो यांनी माध्यमांना सांगितले की, सन्मानामुळे मी आनंदित झाले आहे. पण आभाळाला हात टेकले, असे मुळीच नाही. आई व्हायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य महिलांना मिळावे, यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देत राहीन. तो त्यांचा मूलभूत हक्क आहे.
महिला हक्कांसाठीच्या लढवय्या, नोबेल विजेत्या अर्नो यांची ओळख
नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच लेखिका ॲन अर्नो गर्भनिरोधके आणि गर्भपात हा महिलांचा अधिकार आहे, या मताच्या त्या ठाम पुरस्कर्त्या आहेत. नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर पॅरिसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी या मताचा ठाम पुनरुच्चार केला.
अर्नो सध्या पॅरिसजवळचे औद्योगिक शहर असलेल्या सेरेजीमध्ये राहतात. तेथेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अर्नो यांनी महिलांचे हक्क आणि शांतता प्रस्थापित होण्याची आशा यावरही भाष्य केले. दुसऱ्या महायुद्धामुळे झालेली होरपळ त्यांनी आपल्या बालवयात अनुभवली आहे.
या संदर्भात साहित्याचे नोबेल पारितोषिक निवड समितीचे अध्यक्ष अँड्रेस ऑल्सन म्हणाले, ‘अर्नो कमालीच्या प्रामाणिक लेखिका आहेत. कठोर सत्याला सामोरे जातानाही त्या डगमगलेल्या नाहीत. स्वत:चा गर्भपात, द्वेष, फसवणूक केलेल्या प्रियकराविषयीचे अनुभव अशा गोष्टींवर त्यांनी जे लिहिले आहे, ते अन्य कोणी क्वचितच लिहिले असते. या अनुभवांच्या अभिव्यक्तीसाठी त्यांनी अत्यंत साधी पण मनाला भिडणारी शब्दयोजना केली आहे. साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या अर्नो या पहिल्या फ्रेंच महिला लेखक आहेत. तर, जगातील १७व्या महिला आहेत. आतापर्यंत ११९ लेखकांना साहित्याचे नोबेल मिळाले आहे.
अर्नो यांची लेखन कारकिर्द
त्यांच्या नावे २०हून अधिक पुस्तके. त्यातील अनेक छोटी.
यामध्ये त्यांच्या आयुष्यातील प्रसंगांचे चित्रण.
लैंगिक संबंध, गर्भपात, आजारपण, पालकांचा मृत्यू हे अनुभव लेखनातून मांडले.
पहिले पुस्तक ‘ल आर्मरीज वाइड्स’ (१९७४). याचा इंग्रजी अनुवाद ‘क्लीन्ड आउट’ नावाने प्रकाशित
से क्विल्स डिसेंट ओउ रिन (ते जे म्हणतात, तसे घडले) आणि ल फेम गेल (गोठलेली स्त्री) या आत्मचरित्रात्नमक कादंबऱ्या
-सन १९८३मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ल प्लेस’ (एका माणसाचे घर) या पुस्तकामुळे सर्वांधिक लोकप्रिय
सन १९९७मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ल होन्त’ (शरम) या पुस्तकाने त्यांच्या बालपणातील दु:खद घटनेवर प्रकाश टाकला.
सन २०००मधील ‘ल व्हन्मेंट’ (घटना) या पुस्तकात बेकायदा गर्भपाताचा विषय हाताळला आहे.
सन २००८मधील ‘ले ॲन्स’ (ती वर्षे) या पुस्तकाला समीक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली.
आपल्या पुस्तकांमध्ये त्यांनी स्वत:चा उल्लेख ‘मी’ऐवजी ‘ती’ असा केला आहे.
मेमोयर ग फिल्या (एका मुलीची कथा, २०१६), पॅशन सिंपल, से पेरदर (बेपत्ता होताना) हीदेखील पुस्तके गाजली.
अर्नो यांना लेखन शास्रातील पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या लेखनाचे चीज झाले आणि संघर्षाला न्याय मिळाला, असं दिसून आलं आहे. हे खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस