आदिवासी विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे एसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली कोट्यावधीची संपत्ती

4

नाशिक, २६ ऑगस्ट २०२२ ; आदिवासी विभागातील कामाच्या ठेक्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केलेल्या लाचखोर कार्यकारी अभियंता, दिनेशकुमार बागुल याच्याकडे एसीबीच्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून कोट्यावधीरूपांची संपत्ती मिळाली आहे. लाचेची रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना चक्क मशीन मागवावी लागली आहे.

एसीबी चे अधिकारी मागील पंधरा दिवसांपासून त्याच्या मागावर होते. सेंट्रल किचनच्या कामासाठी बागुल याने बाराटक्के लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिनेश बागुल याच्या नाशिक येथील घरातून ९८ लाख ६३ हजार आणि पुण्यातील घरी ४५ लाख ४० हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे या दोन ठिकाणाहुन एक कोटी ४४ लाखांची रोख रक्कम सापडली. त्याचबरोबर काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. अद्यापही बागुल याच्या अनेक मालमत्तांची झाडाझडती सुरु आहे.

आदिवासी विभागात उच्च पदावर काम करणाऱ्या दिनेश कुमार बागुल याला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आठ्ठावीस लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सुमारे अडीच कोटींचे काम मंजूर करण्यासाठी लाचेची मागणि केली होती. यानंतर बागुल याच्या तिडके कॉलनी परिसरातील एका अलिशान अपार्टमेंटमधील घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली.त्याचबरोबर नाशिकसह पुणे आणि धुळ्यातील घरी छापेमारी सुरू आहे. लाचखोर बागुल याच्याकडे मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान दिनेशकुमार बागुल याच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील चौकशीसाठी कोठडीची मागणी एसीबी कडून केली जाणार आहे. काल दुपारपासून बागुल याच्या घरी सुरू असलेली एसीबीची झाडाझडती अजूनही सुरू आहे. लाचखोर बागुलच्या घरात एकूण किती कोटींचे घबाड मिळाले? हा अधिकृत आकडा समजण्यासाठी कारवाई पूर्ण होई पर्यंतवाट पहावी लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा