गोल पोस्ट समाजकारण माढा तालुक्यातील रांझणी येथीेल उपोषणाची न्यूज अनकटची घेतली प्रशासनाने दखल

माढा तालुक्यातील रांझणी येथीेल उपोषणाची न्यूज अनकटची घेतली प्रशासनाने दखल

रांझणी (माढा, सोलापूर), दि. २४ जून २०२० : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रांझणी या गावी सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य दादा चंदू माने यानी प्रशासनाच्या विरोधात उपोषण सुरू केले होते. रांझणी गावातील घरकुल लाभार्थी गेली वीस वर्षे ज्या जागेवर राहतात त्यांना त्या जागा देण्यात याव्यात, तहसीलदार माढा यांनी गावठाण हद्दीतील प्लॉट धारक यांची प्लॉटची रक्कम भरलेल्या लोकांची ७/१२ वर नोंद लावण्यात यावी, गायरान गट नंबर ३१/१ मध्येजागा शिल्लक नसल्याने गावातील ३५० लोकांची अतिक्रमणे कायम करावीत, उजनी डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असल्याने रांझणी येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती त्या जमिनीवरील ७/१२ सदरी असणारी नावे कमी झाली होती ती पुन्हा नावे लावण्यात यावीत या आणि अशा अनेक मागण्यांसाठी रांझणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य दादा चंदू माने यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.

न्यूज अनकट नी या विषयाला वाचा फोडली होती व बातमी प्रसिद्ध केली होती. मंडळाधिकारी सौ कोरबू यांनी शासनाच्या वतीने उपोषणस्थळी आज पुन्हा भेट देऊन लेखी आश्‍वासन दिल्याने हे दोन दिवस सुरू असलेले उपोषण आज लिंबू पाणी देवून सोडण्यात आले आहे.

यावेळी ग्रामसेवक एल एम शेख, आर एस चव्हाण, खुळे भाऊसाहेेब, पोलीस पाटील, साहेबराव जाधव, सरपंच अदिका जाधव व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी रांझणी ग्रामस्थांनी न्यूज अनकट ने या बातमीस प्रसिद्धी दिल्यामुळे न्यूज अनकटचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version