दर्शवेळा अमावास्येनिमित्त काळ्या आईप्रती शेतशिवारांत कृतज्ञतेचा जागर
पुणे, २४ डिसेंबर २०२२ : लातूर जिल्ह्याच्या कृषी संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेली दर्शवेळा अमावास्या शुक्रवार (ता. २३) लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत उत्साहात साजरी झाली. गावे निर्मनुष्य, तर शिवारे माणसांनी गच्च, गावे निर्मनुष्य दिसत होती. ‘ओलगेsss ओलगेsss सालनsss पोलगेsss’ या घोषाने शिवार गुंजला होता.
काय आहे वेळ अमावस्या?
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यासह कर्नाटकातील सीमावर्ती भागात हा सण साजरा केला जातो. शिवारपूजा, वेळा अमावास्या, येळमाशी, येळवस अशा विविध नावांनी हा सण ओळखला जातो. या सणाचे लिखित संदर्भ उपलब्ध नसले, तरी सृष्टीची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण साजरा केला जातो, असे शेतकरी सांगतात. या दिवशी गावे निर्मनुष्य होतात. तर शिवारं माणसांनी फुलून जातात.
व्यवसाय व नोकरीनिमित्त शहरात गेलेली मंडळी या सणासाठी सहकुटुंब गावी परततात. गाव शहरात जणू अघोषित संचारबंदी लागल्याचा अनुभव या दिवशी नक्की येतो. शेतकरी भल्या सकाळी शेतावर जाऊन काळ्या मातीतून दोन लक्ष्मी साकारतो. तत्पूर्वी त्यांच्या स्थापनेसाठी ज्वारीच्या कडब्याची खोप बनवतो. (घर) त्यातील रानात सडा शिंपून लक्ष्मी स्थापनेसाठी मातीच्या चिखलातून सिंहासन साकारतो. त्याला पानाफुलांनी सजवतो व त्यात लक्ष्मींची प्रतिष्ठापना करतो.
त्यानंतर त्याची सपत्नीक पूजा करून सर्वांच्या कुशलमंगलाची अन् धनधान्य संपन्नतेची तिच्याकडे प्रार्थना करतो. ग्रामदेवता व पांडवांसह शिवारातील देवदेवतांची पूजा करून मानाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर पंगती रंगतात. गावगाड्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बारा बलुतेदारांना या दिवशी मानाच्या जेवणाचे आमंत्रण दिले जाते. सायंकाळी काळ्या रानात एका मडक्यात दूध ऊतू येऊन सांडेपर्यंत तापवले जाते. ते ज्या दिशेला सांडेल त्या दिशेला पीक अधिक पिकते, असे शेतकरी मानतात. रात्रीच्या वेळी तिळाच्या पेंढ्या पेटवून (हेंडगे) त्या हातात घेवून शेतकरी शेताच्या बांधावरुन फेरी मारतात. त्यामुळे थंडी जाते, असा समज आहे.
भज्जी मानाचा मेनू
या सणानिमित्त विविध पदार्थ बनविले जातात. त्यात डाळीच्या पिठात विविध भाज्यांची मिसळ करून तयार केलेली भज्जी हा मानाचा पदार्थ असतो. भज्जीसाठी हिरवी मटार, हरभरा, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगातील हिरवे दाणे, काकडी किंवा वाळूक, वांगी, मेथीचा पाला, कोथिंबीर, कांदापात, लसुणपात, आले, शेंगदाणे, हिरवी चिंच, गाजराचा वापर केला जातो. ज्वारी भरड्याचा आंबड भात, तांदळाची खीर, भात, ज्वारी अन् बाजरीचे उंडे, ज्वारी, बाजारीची भाकरी, तुरीचे फिके वरण याशिवाय बरेच जण धपाटे, तिळाच्या पोळ्याही करतात.
झणझणीत आंबील
या सणाचा दुसरा मानाचा मेनू म्हणजे झणझणीत आंबील. चार-पाच दिवसांच्या आंबट दह्याचे ताक केले जाते. त्यात थोडेचे ज्वारी पीठ शिजवून टाकले जाते. मीठ, जिरेपूड, कोथिंबीर, आले, लसणाचे वाटण अन् मिरची पावडर त्यात कच्चेच टाकतात. ती नव्या मडक्यात ठेवतात. तत्पूर्वी मडके काव-चुन्याने रंगवले जाते. आंबिलीची मज्जा अन् त्यामुळे येणारी जराशी गुंगी काही औरच असते.
पांडव पूजन
शेतीचे रक्षण करतात म्हणून पांडवाचे पूजन या दिवशी केले जाते. यात सात दगड चुन्याने रंगवतात व पुजतात. त्यातील पाच पांडव असतात. तर उर्वरीत दोनमधील एक द्रौपदी, तर एक माता कुंती असते.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी वेळा अमावास्या हा दिवस खरोखरच उत्साहाचा असतो. कारण या अमावास्येला शेतकऱ्यांचा खास सण मानला जातो. शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराट होण्याची मनोकामना व्यक्त करीत काळ्या आईची मनोभावे विधिवत पूजा करून शेतकरी कुटुंबांनी वेळा अमावास्या उत्साहात साजरी केली. ही पूजाही खास पद्धतीनं साजरी केली जाते. वेळा अमावास्येदिवशी सकाळी लवकर उठून शेतकरी आपल्या घरातील परिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणार्या सर्व पिकांची व मातीपासून बनविलेल्या पांडवांची म्हणजे पंचमहाभूतांची पूजा करतात; तसेच शेतामध्ये चूल करून एका मडक्यामध्ये दूध तापवत ठेवून ते उतू घालतात. ज्वारी व बाजरीचे उंडे, अंबील, भात, तिळगूळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भज्जी, खीर अशा एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. आणि काळ्या आईला साकडंही घालण्यात येतं.
अर्थात, हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा असतो की ज्यांचे स्वतःचे शेत नाही त्यांना दुसऱ्यांच्या शेतात आग्रहाने बोलावतात. या दिवशी सगळ्याचा संध्याकाळपर्यंत शेतात मुक्काम असतो. उन्हं उतरली की लोक परतीच्या वाटेला लागतात. एक दिवस काळ्या आईच्या सान्निध्यात राहून पुढच्या वर्षीपर्यंत या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील