पुणे, ८ जून २०२३ : ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी भारताला बॅकफूटवर ढकललं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३ बाद ३२७ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड १४६ धावांवर तर स्टीव्ह स्मिथ ९५ धावांवर खेळत होते. दोघांमध्ये आतापर्यंत २५१ धावांची नाबाद भागीदारी झाली आहे. ट्रॅव्हिस हेडचे कसोटीतील हे सहावे शतक आहे. हेडने आपल्या शतकी खेळीत एक खास विक्रमही केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या इतिहासात शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याशिवाय, हेडच्या शतकासह ४८ वर्षांनंतर प्रथमच असे घडले आहे की, जेव्हा डावखुऱ्या फलंदाजाने आयसीसी फायनलमध्ये पाचव्या क्रमांकावर शतक ठोकले होते.
यापूर्वी १९७५ च्या विश्वचषकात असा पराक्रम घडला होता. त्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाईव्ह लॉईडने पाचव्या क्रमांकावर शतक झळकावले होते. आता तब्बल ४८ वर्षांनंतर असा चमत्कार घडला आहे. यासह स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत २०० धावांची भागीदारी करणारी पहिली जोडी ठरली आहे. दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजांना खूप त्रास दिला. त्याच वेळी, हेड आयसीसी फायनलमध्ये शतक झळकावणारा जगातील केवळ तिसरा फलंदाज बनला आहे.
सामन्यात, मार्नस लॅबुशेनची (२६ धावा) विकेट २५ व्या षटकात पडली, त्यानंतर स्मिथ आणि हेडने दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीचा फायदा घेतला. आतापर्यंत ४४ चौकार आणि एक षटकार मारला गेला आहे, यावरून भारतीय वेगवान गोलंदाजीची खराब कामगिरी स्पष्टपणे दिसून येते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड