खेड, १९ मार्च २०२३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा दि.१९ रोजी शहरांतील महाड नाका येथील एसटी मैदानात आज सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या सभेची जय्यत तयारी शिंदे गटाकडून शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार योगेश कदम तसेच हजारो शिवसैनिकांनी केलीय. यावेळी शिंदे गटाचं जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष या सभेकडं लागलंय.
खेड शहरांतील महाड नाका येथील एसटी मैदानात दि. ५ रोजी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाल्यानंतर त्या सभेला शिवसेनेकडून जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यानंतर लगेचच खेड, दापोली मंडणगडसह संपूर्ण कोकणातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते दि. १९ रोजी सभा घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केलीय.
तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेनेचे भगवे झेंडे, पताका, बॅनर, कटआऊट लावण्यात आले असून सभेला येणाऱ्या शिवसैनिकांच्या सोयी-सूविधांसाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. सभेला होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन चारचाकी वाहनांसाठी व दुचाकी वाहनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर