भाजप शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

पुणे, ०७ ऑक्टोबर २०२०: पुणे शहरातील ढासळत चाललेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शहर भाजपच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिले.

शहरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीत वाढ होत आहे. वाढते खुनाचे गंभीर गुन्हे, घरफोड्या, वाहतुकीची कोंडी आणि अपघात, सायबर गुन्ह्यांद्वारे फसवणूक, युवकांमधील वाढती व्यसनाधीनता, कोविड सेंटर मधील महिलांवरील अत्याचार आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी गुंडा स्क्वाॅड सुरू करावा, पोलीस दक्षता समित्यांची स्थापना करावी, पोलीस विभाग, जनतेचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात, वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना करण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक,सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, महिला आघाडी अध्यक्षा अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा