मुंबई शेअर बाजाराची सुरुवात आजच्याच दिवशी १८७५ साली झाली होती

जाणून घेऊया इतिहास मुंबई शेअर बाजाराचा..

मुंबई शेअर बाजाराला देशाच्या औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक वर्तुळात मोठे महत्त्व आहे. लक्षावधी गुंतवणूकदारांचे भवितव्य मुंबई शेअर बाजारावर अवलंबून असते. शेअर बाजारात होणाऱ्या घडामोडींकडे या गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष असते. हा शेअर बाजार कसा सुरू झाला, याचा मोठा रोचक इतिहास आहे. तो आपण जाणून घेऊया.

आशिया खंडातील सर्वात जुना समजला जाणाऱ्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना चार गुजराती आणि एका पारशी शेअर ब्रोकर्सने केली. हे पाच जण १८५५ च्या सुमारास मुंबईत एका टाऊन हॉलच्या समोरील वडाच्या झाडाखाली बसून व्यवसाय करत असत. शेअर बाजारात व्यवसाय करणाऱ्या ब्रोकर्सची संख्या हळूहळू वाढू लागली. त्यामुळे १९७५ मध्ये या ब्रोकर्सनी एकत्र येऊन द नेटीव्ह शेअर ऍन्ड स्टॉक ब्रोकर असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी दलाल स्ट्रीटवर एक कार्यालयही खरेदी केले. हेच कार्यालय सध्या मुंबई शेअर बाजार म्हणून ओळखले जाते.
राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच एन.एस.ई.ची स्थापना १९९० मध्ये डी मॅच्युअल इलेक्‍ट्रॉनिक एक्‍सचेंजच्या रुपात केली गेली. विविध क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या राष्ट्रीय शेअर बाजाराचे संचालन करीत असतात. या शेअर बाजारात १६०० हून अधिक कंपन्या नोंदणीकृत झाल्या आहेत. जगातील शेअर बाजारांच्या नियंत्रणासाठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्‍सचेंज नामक संस्था तयार करण्यात आली आहे. जगातील प्रमुख ६२ शेअर बाजार या संस्थेचे सदस्य आहेत. २५ जानेवारी २००१ रोजी मुंबई शेअर बाजाराने डॉलेक्‍स ३० सादर केले. याला मुंबई शेअर बाजाराचे डॉलर्सशी निगडित व्हर्जन समजले जाते.

मुंबई शेअर बाजारात १.३२ खर्व एवढी गुंतवणूक झाली आहे. व्यवहाराचा विचार केला तर मुंबई शेअर बाजार हा जगातील ११व्या क्रमांकाचा शेअर बाजार ठरतो. मुंबई शेअर बाजारात राकेश झुनझुनवाला हे सर्वांत मोठे बुल ट्रेडर मानले जातात. झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफे असे म्हटले जाते. त्यांनी ज्या कंपनीचे शेअर खरेदी केले त्या कंपनीच्या शेअरचा भाव लगेच वाढतो असे दिसून आले. सध्या झुनझुनवाला हे हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट या कंपनीचे अध्यक्ष आहेत.

शेअर बाजाराचा बुल

शेअर बाजार संदर्भात बुल (बैल) हा शब्द नेहमी वापरला जातो. शेअर बाजाराच्या इमारती बाहेर बैलाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. यामागे वेगळा अर्थ आहे. बैलावर जो कोणी हल्ला करेल त्यावर बैल प्रतिहल्ला करतो. म्हणजे लगेच हल्ला करणाऱ्याला बैल शिंगावर घेतो. बैलाच्या या कृतीद्वारे शेअर बाजारातील घडामोडी प्रतीत होतात असे समजले जाते. ब्रिटनमध्ये १७व्या शतकात एका क्‍लबमध्ये बैलाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. ती प्रतिमा ठेवल्यानंतर व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात मोठा लाभ झाल्याचे आढळून आले होते. या अंधविश्‍वासामुळे शेअर बाजारात बुल या शब्दाचा प्रतीकात्मकरित्या वापर केला जातो.

शेअर बाजार आणि बीअर

शेअर बाजारावर बुल या शब्दाबरोबरच बीअर म्हणजेच अस्वल या शब्दाचाही वापर केला जातो. अस्वल एखाद्या वस्तूवर अथवा व्यक्‍तीवर ज्याप्रमाणे झडप घालते त्याप्रमाणेच शेअर बाजारातही घडामोडी होतात असे मानले जाते. अस्वल हे शेअर बाजारात होणाऱ्या घसरणीचे प्रतीक मानले जाते. शेअर बाजारात अचानक निर्देशांक मोठ्या अंकांनी गडगडतो. १७ व्या शतकात अस्वलाची कातडी विकणारी मंडळी अस्वलाला पकडण्याअगोदरच त्या कातडीची किंमत घेत असत. जर त्यावेळी बाजारातील अस्वलाच्या कातडीची किंमत कमी झाली तर अस्वल पकडणाऱ्या व्यक्‍तीला पूर्ण पैसे द्यावे लागत असत. अशा तऱ्हेने हा व्यवहार त्या व्यक्‍तीला तोट्याचा ठरत असे. त्यामुळे शेअर बाजारात बेअर ट्रेडिंग म्हणजेच नुकसानीचे व्यवहार असा शब्द प्रचलित झाला.

मंदडीए आणि तेजडीए

शेअर बाजारात मंदी आणणाऱ्या दलालांना अथवा व्यावसायिकांना मंदडीए असे म्हणतात. अशा प्रवृत्ती आपल्या जवळील शेअर पटापट विकून जास्तीत जास्त नफा कमावू इच्छितात. याउलट ज्या व्यक्‍ती शेअर बाजारात भराभर शेअर खरेदी करत राहतात शेअरची खरेदी झाल्यामुळे बाजारात आपोआप तेजी येते. अशा व्यक्‍तींना तेजडीए असे म्हणतात.

शेअर कॉर्नर

विशिष्ट कंपनीचे शेअर एकत्र करणाऱ्याला शेअर कॉर्नर असे म्हणतात. एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत वाढ होईल अशी शक्‍यता दिसू लागते तेव्हा त्या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची स्पर्धा लागते. शेअर बाजारात चक्री नामक स्थिती उत्पन्न होते. ज्यावेळी शेअर बाजारात मंदडीए आणि तेजडीए दोघेही सक्रिय होतात त्यावेळी ही स्थिती उत्पन्न होते. या स्थितीत ब्रोकर्स एखाद्या कंपनीचे अधिकाधिक शेअर खरेदी करण्याच्या मागे लागतात. ही स्थिती कोणत्याही शेअर बाजाराच्या दृष्टीने चांगली मानली जात नाही.

ब्ल्यू चिप कंपन्या

बाजारात ज्या कंपनींची तरलता (फ्लो) जास्त असते. त्या कंपन्यांना ब्ल्यू चिप कंपन्या असे म्हणतात. ज्या कंपन्या गुंतवणूकदारांना सातत्याने फायदा देतात अशा कंपन्या ब्ल्यू चिप या गटात समाविष्ट होतात. शेअर बाजार सुरू होताना आणि संपताना तेथील डेस्कवर हातोडी वाजवली जात असे. नंतर त्या हातोडीची जागा घंटीने घेतली. १९०३ मध्ये शेअर बाजार सुरू होताना आणि बंद होताना घंटी वाजवण्याची पद्धत रुढ झाली. न्यूयॉर्क शेअर बाजारात या प्रथेला प्रारंभ झाला. आता सर्व शेअर बाजारात या पद्धतीचा अवलंब केला जातो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा