पुणे, ९ फेब्रुवारी २०२३ : प्रतीक्षा अखेर संपली. दोन वर्षे आणि सुमारे २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जागतिक क्रिकेटच्या दोन शक्ती पुन्हा भिडणार आहेत. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होत आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स कर्णधार म्हणून पहिल्यांदाच आमनेसामने आहेत. एका बाजूला भारतीय संघ आहे, ज्याने मागील सलग तीन मालिका जिंकल्या आहेत, त्यापैकी दोन फक्त ऑस्ट्रेलियात आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आहे, ज्याने २००४ पासून भारतात फक्त एकच कसोटी सामना जिंकला आहे. यावेळी इतिहास बदलणार की भारताचा दबदबा कायम राहणार, हे नंतर समजेल; पण त्याची सुरवात आजपासून होईल.
या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने टॉड मर्फीला पदार्पणाची संधी दिली आहे. पीटर हँड्सकॉम्बलाही प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले आहे. भारताकडून तीन फिरकीपटू खेळत आहेत. या सामन्यात भारताने दोन खेळाडूंना संधी दिली आहे. सूर्यकुमार यादव टी-२० मध्ये ताकद दाखविल्यानंतर कसोटीसाठी सज्ज झाला आहे. तो आज कसोटी पदार्पण करीत आहे. यष्टिरक्षक के. एस. भरतलाही त्याच्यासोबत पदार्पण करण्याची संधी मिळत आहे.
२०१८-१९ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभूत केले होते. यानंतर २०२०-२१ मध्येही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. त्याच पराभवाचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या नजरा लागल्या आहेत.
असे आहेत टीम इंडियाचा आणि ऑस्ट्रेलियाचा संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, के. एस. भरत (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव स्मिथ, पीटर हॅंड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), टॉड मर्फी, ॲश्टन अगर, ट्रॅव्हिस हेड, नाथन लायन आणि स्कॉट बोलॅंड.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड