४६ वर्षांपूर्वीची होती इमारत, तरीही धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हता समावेश

ठाणे, २१ सप्टेंबर २०२०: आज पहाटे ठाण्याला लागून असलेल्या भिवंडीतील तीन मजली इमारत कोसळली. या अपघातात आतापर्यंत ८ लोकांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय, तर ८ जणांचा सुखरुप बचाव करण्यात आलाय. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे. असं सांगितलं जात आहे की, १९८४ मध्ये बांधल्या गेलेल्या या ३ मजली ‘जिलानी’ इमारतीचा अर्धा पहाटेच्या सुमारास कोसळला.

आश्चर्यकारक म्हणजे, भिवंडी निजामपूर महानगर पालिकेच्या म्हणण्यानुसार जिलानी अपार्टमेंट धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती. या इमारतीत तळ आणि तीन मजले होते. या इमारतीत एकूण ४० फ्लॅट्स आहेत, ज्यात १५० लोक राहतात. २५ ते ३० लोकं इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, त्यापैकी ८ मृतदेह बाहेर काढले गेले आहेत, तर ८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

यावेळी ठाणे जिल्हा प्रशासनाचे १५ कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे ३० जवान उपस्थित असून बचावकार्य चालू आहे. ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांमध्ये मोबिन शेख, सलमानी, रुकर कुरेशी, मोहम्मद अली, साबिर कुरेशी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त झुबेर, फैजा, आयशा, बबलू यांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा