केंद्र सरकारने थांबवली रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात

नवी दिल्ली, १२ एप्रिल २०२१: देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.

केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासू लागला आहे. औषधांची अशीच कमतरता राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या सर्व कंपन्यांना केंद्र सरकारने इंजेक्शनविषयीची सर्व माहिती त्यांच्या वेबासाईटवर अपडेट करण्याचेसु्द्धा निर्देश दिले आहेत. सर्व रेमेडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर इंजेक्शनची उपलब्धता, त्याचा पुरवठा तसेच वितरक यांची सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करुन द्यावी असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा