१ सप्टेंबर पासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार

नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२०: २४ मार्च पासून सर्वत्र लॉक डाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर सर्वच शैक्षणिक संस्था, कॉलेज, शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांचे कोरोनाव्हायरसमुळे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. शाळा सुरु होणार की नाही? सध्या हा सर्वात मोठा प्रश्न पालकांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर उभा राहिलेला आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉक डाऊन किंवा अनलॉक ३ संपणार आहे. त्यानंतर सरकार पुन्हा नवीन नियमावली जाहीर करणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार असे सांगण्यात येत आहे की, ३१ ऑगस्ट नंतर केंद्र सरकार शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ शकते.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या दरम्यान केंद्र सरकार शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. लॉक डाउन घोषित झाल्यापासून तब्बल पाच ते सहा महिने शाळा व शिक्षण संस्था बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून ऑनलाइन शिक्षण हा पर्याय सुचविण्यात आला होता. मात्र ऑनलाइन शिक्षण देखील पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पचनी पडताना दिसत नाहीये. विद्यार्थ्यांची आणि शाळांची देशातील एकूण परिस्थिती पाहता आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. ३१ ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या अनलॉकच्या नव्या गाइडलाइन्समध्ये याचा समावेश असण्याची शक्यता आहे.

१ सप्टेंबर नंतर जारी करण्यात येणाऱ्या नवीन गाईडलाईन मध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल असे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर शाळा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कसे आणायचे आणि कधी आणायचे याबाबतचा निर्णय राज्य सरकार वर राहणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा