केंद्र सरकारने जैन बांधवांच्या भावनांचा विचार करावा; राज ठाकरेंचे ट्विट

मुंबई, ५ जानेवारी २०२३: झारखंडमधील जैन समाजाचे गिरीहीद जिल्ह्यातले तीर्थधाम ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय झारखंड सरकारने घेतला. मात्र, या निर्णयाला जैन समाजाकडून विरोध करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात देशभरात आंदोलनदेखील सुरू आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, मुंबई अश्या शहरांमध्ये जैन समाजाने मोर्चे काढत निर्णय रद्द करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या मुद्द्यावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत असून झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी दिली आहे.

  • कोल्हापूरात मूक मोर्चा

मंगळवारी ह्याच मुद्द्यावरून कोल्हापूरमध्ये जैन समाजाने विराट मूक मोर्चा काढला. या मोर्चाच्या निमित्ताने जैन समाजाने संघटित शक्ती दाखवून दिली. ‘सम्मेद शिखरजी पवित्र स्थल है, पर्यटन स्थल नही बनेगा’ असा निर्धार जैन समाजाने मोर्चातून दाखवून दिला. तर या मोर्चात नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नागरिकांच्या या मागणीवर सरकार काही पाऊल उचलते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, आता अनेक नेत्यांनी देखील स्वतःचे मत स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा