केंद्र सरकार ‘या’ ६ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या कंपन्यांना करणार बंद…

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२०: केंद्र सरकार निर्गुंतवणुकीच्या मोर्चावर वेगानं वाटचाल करत आहे. केंद्र सरकारनं चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून २.१० लाख कोटी रुपयांची मोठी रक्कम जमा करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीद्वारे सरकार १.२० लाख कोटी रुपये जमा करल. त्याचबरोबर वित्तीय संस्थांच्या भागभांडवल विक्रीतून आणखी ९०,००० कोटी रुपये उभे केले जातील.

केंद्रीय अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी निर्गुंतवणुकी बाबत उचललेल्या पावलांची माहिती दिली. ते लोकसभेत म्हणाले की, सरकार २० कंपन्या (सीपीएसई) आणि त्यांच्या युनिट्समधील हिस्सा भांडवलाची विक्री करण्याच्या तयारीत आहे, सध्या या कंपन्या मोक्याच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यात आहेत.

या व्यतिरिक्त त्यांनी महत्वाची माहिती दिली. अनुराग ठाकूर म्हणाले की, “सरकार ६ सरकारी कंपन्या (सीपीएसई) बंद करणार आहे. ते म्हणाले की नीति आयोगानं सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी काही अटी घातल्या आहेत. त्याआधारे २०१६ पासून सरकारनं ३४ प्रकरणात धोरणात्मक निर्गुंतवणुकीस तत्वत: मान्यता दिलीय.”

• हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड:

हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड ही रसायने व पेट्रोकेमिकल्स विभागांतर्गत एक सरकारी कंपनी आहे. या तोट्यात काम करणार्‍या कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ऐच्छिक पृथक्करण व सेवानिवृत्ती योजनेंतर्गत योग्य मोबदला दिला जाईल. यासाठी सरकार कोणत्याही व्याजाशिवाय ७७.२० कोटी रुपये कंपनीला देईल. कंपनीची जमीन व मालमत्ता विकून मिळालेल्या पैशातून याची भरपाई होईल.

• स्कूटर इंडियाः

देशाला लॅम्ब्रेटा, विजय डिलक्स आणि विजय सुपर सारख्या स्कूटर उपलब्ध करून देणाऱ्या स्कूटर इंडिया लिमिटेडला केंद्र सरकारनं बंद करण्याची घोषणा केलीय. या कंपनीचं सर्वात शेवटचं उत्पादन म्हणजे १९८० मध्ये स्कूटर इंडियानं लॅम्ब्रेटा बाजारात लॉन्च केली होती. या कंपनीचे सर्व प्लांट बंद आहेत.

• भारत पंप्स अँड कंप्रेशर्स लिमिटेड:

भारत पंप्स अँड कंप्रेशर्स लिमिटेड ही भारत सरकारची लघुरत्न कंपनी आहे. या कंपनीमार्फत रेसिप्रोकेटिंग पंप, सेन्ट्रिफ्युगल पंप, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आणि हाय प्रेशर सीमलेस गॅस सिलिंडर तयार केले गेले. कंपनीचं मुख्यालय अलाहाबाद येथे आहे.

हिंदुस्तान प्रीफॅब:

हिंदुस्तान प्रीफेब लिमिटेड (एचपीएल) ही भारतातील सर्वात जुनी सीपीएसई आहे. एचपीएल’ची स्थापना १९४८ मध्ये एक विभाग म्हणून झाली. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानमधून स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या निवासी गरजा भागविण्यासाठी या कंपनीची स्थापना केली गेली. नंतर १९५३ मध्ये हिंदुस्तान हाऊसिंग फॅक्टरी लिमिटेड या नावानं कंपनीची पुन्हा स्थापना करण्यात आली. ९ मार्च १९७८ रोजी या कंपनीचं नाव हिंदुस्तान प्रीफेब लिमिटेड केलं गेलं.

• हिंदुस्तान न्यूजप्रिंट लिमिटेड:

हिंदुस्तान न्यूजप्रिंट (एचएनएल) ची स्थापना ७ जून १९८३ रोजी केरळमधील वेल्लोर येथे हिंदुस्तान पेपर कॉर्पोरेशन लिमिटेड’ची संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी म्हणून झाली. वर्ष १९९८ मध्ये, एचएनएल आयएसओ ९००२ प्रमाणपत्र प्राप्त करणारी देशातील पहिली न्यूजप्रिंट कंपनी बनली. सध्या कंपनीला ताळं लावण्यात आलंय.

• कर्नाटक अ‍ॅन्टीबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (केएपीएल):

१९८४ मध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासूनच केएपीएलनं विविध जीवनरक्षक आणि जीवनावश्यक औषधांच्या निर्मिती आणि विपणनामध्ये ठोस पाऊल ठेवलं होतं. आयएसओ मान्यता बरोबरच, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुणवत्ता आणि सेवांबद्दलच्या संपूर्ण बांधिलकीबद्दल केएपीएलला ओळख मिळाली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा