जुनी पेन्शन योजनेसाठी तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी मध्यवर्ती संघटनाही होणार संपात सहभागी

छत्रपती संभाजीनगर, १२ मार्च २०२३ : राज्य सरकारी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या मंगळवारपासून (ता.१४ मार्च) बेमुदत संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. आज छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी १४ मार्चला होणाऱ्या संप हा शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने याबद्दल आधीच इशारा दिला आहे. आता तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी मध्यवर्ती संघटनाही या संपात सहभागी झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत संप नको, सर्व कर्मचारी, संघटनांशी चर्चेला तयार आहे. जुनी पेन्शन योजनेबाबत घाईने नव्हे, तर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल असे म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाने २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक; तसेच इतर विविध समस्यांना तोंड देण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आपत्ती येऊ शकते. त्यासाठी जुनी पेन्शन योजना राज्यात लागू करण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विविध स्तरावरून निवेदने, मोर्चा, आंदोलने करूनही राज्य शासनाने सदर मागणीवर सहानुभूतिपूर्वक विचार न करता आजपर्यंत कोणत्याही स्वरूपाची ठोस भूमिका घेतलेली नाही. त्या निषेधार्थ राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहे.

तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी मध्यवर्ती संघटना ही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न असून, तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे बहुतांश सभासदही २००५ नंतर सेवेत आलेले असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नवीन कर्मचान्यासाठी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, ही तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची अतिशय ठाम भूमिका आहे. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ अशी परिस्थिती असलेल्या या बेमुदत संपात सहभागी व्हावे, अशी विनंतीही तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी या बैठकीला समन्वय समीतीचे निमंत्रक तथा राज्य उपाध्यक्ष डॉ. देवीदास जरारे, तलाठी संघाचे राज्य अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, जिल्हा परिषेदेचे राज्य सरचिटणीस संजय महाळणकर, नर्सेस फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा इंदूमतीताई थोरात, तंत्रशिक्षण कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष सुरेश कर्पे, महसूलचे विभागीय सचिव तथा तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र गिरगे, मध्यवर्तीचे जिल्हा सरचिटणीस एन. एस. कांबळे, महसूलचे जिल्हा अध्यक्ष परेश खोसरे, ऊर्मिला धारूरकर, मध्यवर्तीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा एनएसपीचे रामेश्वर मोहिते, बाळू गावडे, भाऊसाहेब पांडे, शीला अरबुने, मध्यवर्ती संघटनेचे खातेनिहाय संघटनेचे व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा