नवी दिल्ली, १४ फेब्रुवरी २०२१: कोविडनंतरच्या काळात पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या एकूण मालवाहतूक महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असून तो ९८०६८.४५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा महसूल ९७३४२.१४ कोटी रुपये इतका होता.
महिन्यांच्या महसुलाची तुलना करायची झाल्यास, फेब्रुवारीच्या पहिल्या १२ दिवसांतच रेल्वे मालवाहतूक महसुलात गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या तुलनेत ५% टक्क्यांची वाढ झाली आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये, गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत, रेल्वेच्या महसुलात २०६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
एका अंदाजानुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या १२ दिवसांत रेल्वे मालवातुकीचा महसूल ४५७१ कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात तो ४३६५ कोटी रुपये इतका होता. मालाच्या वाहतुकीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
रेल्वेने व्यावसायिक विकास, विविध प्रोत्साहन आणि सवलती, वेग आणि लोकांच्या अपेक्षेनुरूप वैयक्तिक सोयी-सुविधा देण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे ही महसूल वाढ साध्य केली आहे.
रेल्वेच्या मालवाहतुकीत, आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत, ऑगस्ट २०२० पासूनच वाढ होत आहे. मात्र कोविड टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच या महिन्याच्या महसूलाने गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ नोंदवली आहे.
मालवाहतुकीत होणारी वाढ, ही देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणेचे निदर्शक आहे. त्याचवेळी, रेल्वेने व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि मालवाहतुकीत सुधारणा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे हे फलित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे