पुरंदर, दि. २४ जुलै २०२०: देशभरात कोरोनाने मोठा उच्छाद मांडला आहे. त्यातही महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावले आहेत. यामध्येच विवाह सोहळे हे २० व्यक्तींमध्ये पार पडावेत अशी अट शासनाने घातलेली आहे. मात्र शासनाची ही अट धुडकावत जिल्ह्यात शेकडो लोकांच्या उपस्थित विवाह सोहळे साजरे होत आहेत. प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यामध्ये आणि त्यातही मुंबई, पुणे या भागात कोरोनाचा प्रसार मोठा आहे. शासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या. मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अनेकांकडून आता टाळेबंदीला विरोध होत आहे. टाळेबंदी करूनही कोरोना आजाराचा प्रसार थांबत नाही असे या पाठीमागे कारण सांगितले जात आहे. लोकांनी एकत्र येऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणूनच असे वेगवेगळे निर्बंध घातले जात आहेत. मात्र या निर्बंधाचे लोकांकडून सोयीस्कररीत्या उल्लंघन होत आहे. यामुळेच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये प्रमुख कारण आहे शहर आणि खेडेगावात होत असलेले विवाह सोहळे.
सध्या ज्याप्रमाणे कोरोनाची लाट यावी त्याचप्रमाणे विवाह सोहळ्याची सुद्धा लाट आल्याची पाहायला मिळते आहे. थोडक्यात विवाह उरकून घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो आहे. अनेकांनी तर टाळेबंदीच्या काळातच मुलगी पाहण्याचा कार्यक्रम उरकले व विवाह निश्चित केले. आता ते लग्न सोहळे पार पडत आहेत. या सोहळ्याला राज्य सरकारने २० व्यक्तींच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडावेत ही अट घातली आहे. मात्र या अटीचे उल्लंघन होताना पाहायला मिळते आहे. लोक या सोहळ्याची परवानगी घेताना वीस लोकांची यादी सादर करत असले, तरी सोहळ्याला मात्र शंभराहून अधिक लोकांची उपस्थिती पाहायला मिळते. त्याचबरोबर विवाह सोहळ्याच्या वेळी जेवणाच्या पंगती उठत आहेत. अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रसार हा विवाह सोहळ्यात झाल्याचे पाहायला मिळते आहे. तरीदेखील प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने पहात नाही. अशा प्रकारच्या विवाह सोहळ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी शासनाच्यावतीने काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे होऊन बसले आहे. मात्र या गोष्टीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे आणि म्हणूनच शेकडोंच्या उपस्थितीत हे विवाह सोहळे पार पडतात.
हिंदू संस्कृतीनुसार विवाह सोहळा जरी प्रमुख सोहळा असला तरी विवाह सोहळ्यापूर्वी आणि सोहळ्यानंतर अनेक विधी केले जातात. यानुसार गावातील देवीला सुवासिनींनी घालणे, दंडवत, गावदेवाची पुजा करणे, महिलांना बांगड्या भरणे, अशा प्रकारचे विधी केले जातात. या विधीमध्ये सुद्धा संपूर्ण गाव एकत्र येत गर्दी करत असतो. त्याचबरोबर विवाहानंतर सत्यनारायणाची पूजा घातली जाते. या कार्यक्रमाला नवऱ्या मुलाच्या घरी गावातील लोकांना जेवण दिले जाते किंवा किमान तीर्थप्रसादासाठी तरी लोक येत असतात. यावेळी लोकांचा संपर्क एकमेकांशी होत असतो. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
त्यातच पुढील काळात ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुका यामुळे गाव पुढारी अशा प्रकारचे लग्न लावून लग्न मालकावर उपकार करण्यासाठी व आपले मत निश्चित करण्यासाठी धडपडताना दिसतो आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका ग्रामीण भागात वाढत आहे. विवाहापूर्वीची खरेदी ही सुद्धा कोरोनाचा प्रसार होण्यासाठी उपयुक्त ठरते आहे. अशाप्रकारच्या बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष दिले तरच कोरोनाचा होणारा प्रसार थांबू शकेल. अन्यथा शासन आज पर्यंत करत असलेल्या प्रयत्नांना कोणताच अर्थ उरणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहूल शिंदे