इंदापूर, दि.७ मे २०२०: यंदा कडक उन्हाळ्यामुळे हिरवा चारा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव मेंढपाळांना चाऱ्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. इंदापूर तालुक्यातील मेंढपाळांचे हाल होत असल्याचे दिसू लागले आहे.
मागील दहा बारा दिवसांपासून तिव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. उन्हाळ्याला सुरूवात झाली की, शेळ्या-मेंढ्यांना हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे मेंढपाळांचे लोंढे तालुक्यातील भागात दाखल झाले आहेत. यंदाचा उन्हाळा कठीण असल्याचे मेंढपाळ सांगत आहेत. सध्या हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवत असल्याने त्यांना इतरत्र भटकावे लागत आहे. सध्या तरी मुबलक पाणीसाठा असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नाही. परंतु हिरवा चारा जनावरांना मिळत नाही. दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा वाढतो त्यावेळी मेंढपाळ झाडाखाली विसावा घेतात.
यंदा कोरोनामुळे चारा छावणी सुरू होण्याची शक्यता कमी असल्याने मेंढपाळ त्यांची मोठी जनावरे घरीच ठेवत आहेत. कमालीचा उन्हाळा आणि कोरोना यामुळे मेंढ्या घेऊन हिंडण्यास भीती वाटत असल्याचे मेंढपाळांनी “न्युज अनकट” शी बोलताना सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे