वढू बुद्रुक, दि. ८ ऑगस्ट २०२०: वढू ते कोरेगाव भीमा या तीन किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याने प्रवास करणारे नागरिक त्रस्त झालेले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासूनया या रस्त्याची फार बिकट परिस्थिती झाली आहे.
रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही. महत्त्वाचा रस्ता असलेल्या कामाकडे मात्र तालुक्यातील लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेले आहे. पंचक्रोशी शिरूर तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य तसेच देशाचे श्रद्धास्थान असलेले दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ, चांगले आरोग्य व्यवस्था असणारे केइएम हॉस्पिटल तसेच कायम समाजसेवेत असणारी माहेर संस्था यांना जोडणारा हा रस्ता आहे. त्याचप्रमाणे आपटी वाजेवाडी, पिंपळे ,जगताप वाजेवाडी, चौफुला मार्गे चाकण शिक्रापूर पुढे केंदुर पाबळ करंदि अशा मोठ्या गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचे महत्त्व आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र असून ऊस व शेतमाल वाहतुकीसाठी या रस्त्याचा वापर होत असतो व खड्याची खूपच अडचण होत आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपतींच्या समाधीस्थळी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांची ये – जा असल्याने लोकांना खूपच अडचणीतून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर खूप अपघात होत आहेत कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
शिरूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी मात्र मौन धारण करून बसले आहेत. या रस्त्याचे काम कधी होईल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची खूपच गंभीर अवस्था होत आहे. संबंधित रस्त्याचे तातडीने काम व्हावे अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असे प्रवास करणाऱ्या लोकांनी व स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे