दुग्ध पुरवठा साखळी कायम ठेवण्यासाठी मदर डेअरीचे योगदान

नागपूर, दि. १९ मे २०२०: देश कोविड -१९ महामारीचा सामना करीत असताना आणि लॉकडाऊन दरम्यान लोकांना अन्न आणि आरोग्य सेवा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून देणे महत्वाचे आहे. जेव्हा ग्राहकांसाठी त्यांचा पुरवठा कायम ठेवणे महत्वाचे आहे; तेव्हा शेतकर्‍यांसाठीही हे आवश्यक आहे की निर्बंधांमध्येही त्यांचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी त्यांच्यापासून सुरू होणारी मूल्य साखळी कार्यरत ठेवली जावी. यासंदर्भात पुढाकार घेताना, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (एनडीडीबी) संपूर्ण मालकीची असलेली उपकंपनी मदर डेअरीने लॉकडाऊन दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा विभागातील दुग्ध पुरवठा साखळी स्थिर ठेवण्यासाठी योगदान दिले. नागपूर शहराच्या सिव्हिल लाइन्स भागात स्थित, मदर डेअरी शेतकर्‍यांना सर्वतोपरी सहकार्य करीत असून तिच्यामार्फत विदर्भ आणि मराठवाडा विभागात दररोज सरासरी 2.55 लाख लिटर दुधाची खरेदी केली जात आहे.

शेतकरी आणि ग्राहकांशी संपर्क दृढ करण्यासाठी मदर डेअरी वचनबद्ध आहे. प्रदेशातील कोविड -१९ च्या उद्रेकानंतर, दुग्धशाळेने एक दिवसदेखील खरेदीचे काम थांबवलेले नाही; उलट या संकटकाळातही या डेअरीचे दुध संकलन १६% नी वाढले आहे.

मदर डेअरीने नवीन शेतकर्‍यांशी संपर्क साधत सुमारे २४,००० शेतकऱ्यांना डेअरीशी जोडले. दूध खरेदी यंत्रणेतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील १० जिल्ह्यांतील सुमारे २५०० गावे आहेत. मदर डेअरीने हे सुनिश्चित केले आहे की दूध परीक्षण आणि वजन यंत्रणेतील संपूर्ण पारदर्शकतेसह सर्व संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाची देय असलेली रक्कम १० दिवसातून एकदा त्यांच्या बँक खात्यात योग्य वेळी जमा केली जाईल. गेल्या २ महिन्यांत सुमारे ६५ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. दुग्धशाळेने या भागातील दूध उत्पादकांना गुरांच्या समतोल आहाराची आणि पूरक आहाराची आवश्यक ती व्यवस्था केली आहे.

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून मदर डेअरीने संपूर्ण मूल्य साखळीत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जनजागृतीपर सर्व प्रयत्न केले आहेत. शेतकर्‍यांना मास्क वापरण्याचा तसेच संकलन केंद्रात गर्दी न करण्याचा, सुरक्षित अंतराचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे खरेदी व वाहतूक क्षेत्रात सामील असलेल्या कर्मचार्‍यांना स्वच्छता राखण्यास सांगण्यात आले आहे.

नागपूर व जवळपासच्या शहरांत ९० हून अधिक दूध संकलन केंद्रे असणाऱ्या मदर डेअरीने ग्राहकांना सुरक्षित उपाययोजनांद्वारे नियमित पुरवठा सुनिश्चित केला आहे. नागपूर महानगरपालिकेने सिव्हिल लाइन्स येथील आमदार वसतिगृहात कोविड -१९ लढवय्यांसाठी प्राधान्याने स्थापन केलेल्या सरकारी विलगीकरण क्षेत्रात किऑस्कस उभारण्यासाठी मदर डेअरीचे योगदान आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा