कोविड-१९ च्या लढ्यात अल्पसंख्याक समुदायाचेही तितकेच योगदान

नवी दिल्ली, दि. १० मे २०२०: अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित १५०० हून अधिक आरोग्य सहाय्यक कोरोना रुग्णांच्या उपचारात मदत करत असल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.

या आरोग्य सहाय्यकांमध्ये ५० टक्के मुलींचा समावेश असून देशभरातली विविध रुग्णालये आणि आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांच्या उपचारात त्या मदत करत आहेत. या वर्षी २००० पेक्षा जास्त आरोग्य सहाय्यकांना अल्पसंख्याक मंत्रालयाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. आरोग्य सहाय्यकांना, देशातल्या विविध आरोग्य संस्था आणि नामांकित रूग्णालयाद्वारे, मंत्रालय एक वर्षाचे प्रशिक्षण देत आहे.

देशातल्या विविध वक्फ मंडळांनी, विविध धार्मिक,सामाजिक  आणि  शैक्षणिक संस्थांच्या सहाय्याने कोरोना महामारी विरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ कोटी रुपयांचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. याच बरोबर वक्फ मंडळे, गरजूंना अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटपही करत आहेत.

कोरोना बाधितांच्या क्वारंटाईन आणि विलगीकरणासाठी देशातली १६ हज हाउस राज्य सरकारांना देण्यात आली आहेत. विविध राज्य सरकारे त्यांच्या आवश्यकतेनुसार हज हाउसच्या या सुविधांचा उपयोग करत असल्यचे नक्वी यांनी सांगितले.

अलीगड मुस्लीम विद्यापीठाने ‘पीएम केअर्स’मधे १.४० कोटी रुपयांचे योगदान दिल्याची माहिती त्यांनी दिली. अलीगड मुस्लीम विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी १०० खाटांची व्यवस्था केली आहे. अलीगड मुस्लीम विद्यापीठाने कोरोना निदान  चाचण्यांचीही व्यवस्था केली असून आतापर्यंत ९००० पेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अजमेर शरीफ दर्गा इथे ख्वाजा मॉडेल स्कूल आणि कयाद विश्रामस्थळी इथे क्वारंटाईन आणि विलगीकरण सुविधांची व्यवस्था केली आहे. दर्गा समिती आणि संलग्न संस्थानी सुमारे १ कोटी रुपयांच्या सुविधा पुरवल्या, लॉक डाऊन मुळे अडकलेल्या लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्याच्या व्यवस्थेचाही यात समावेश आहे.

अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या ‘शिका आणि कमवा‘ या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात फेस मास्क तयार करण्यात आले असून गरजूंना त्याचे वाटप करण्यात येत आहे. कोरोना संदर्भात घ्यायच्या खबरदारीसाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर मार्गदर्शक सुचनाविषयी जनतेमध्ये जागृती करण्यासाठी  ‘जान भी, जहान भी’ हे जन जागृती अभियान अल्प संख्याक मंत्रालय हाती घेणारआहे.

कोरोना महामारीचे संकट नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशातली सर्व जनता एकजुटीने आणि खंबीरपणे काम करत असल्याचे नक्वी म्हणाले. या लढ्यात अल्पसंख्याक समुदायाचे लोकही  समाजातल्या सर्व लोकांसह तितकेच योगदान देत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा