उस्मानाबाद, २१ ऑक्टोंबर २०२२: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना उस्मानाबाद न्यायालयाने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आंदोलनादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर कडू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू कोर्टात हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते.
काय आहे प्रकरण
उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं, या आंदोलनादरम्यान वाद झाला होता. तसेच सरकारी कामात अडथळा करण्यात आला होता. तर या प्रकरणात बच्चू कडू यांच्यासह अन्य तिघांना उस्मानाबाद न्यायालयाने दंड ठोठवला आहे. तसेच यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन देखील रद्द करू अशी तंबी जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली आहे.
याआधी २१ सप्टेंबर रोजी मंत्रालयातील कर्मचारी मारहाण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना नियमित जामीन मंजूर केला होता. साल २०१८ मध्ये केलेल्या एका राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्यात त्यांना गिरगाव दंडाधिकारी कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण त्याच दिवशी तातडीने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत बच्चू कडू यांनी ताप्तुरता जामीन मिळवला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी रितसर नियमित जामीनासाठीही अर्ज केला होता. ज्यावर सुनावणी घेत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी २२ सप्टेंबर रोजी या प्रकरणात कडू यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यासह तितक्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला. तसंच तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देत कोणत्याही साक्षी पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे आदेशही दिले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे