मुंबई, दि. ११ जुलै २०२०: आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेली धारावी गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई मधील सर्वात जास्त संसर्गित भागांमध्ये गणली जात होती. अतिशय घन लोकवस्ती असलेल्या या भागामध्ये कोविड -१९ वर आश्चर्यकारकरीत्या नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. धारावीच्या या मॉडेल चे आता जागतिक आरोग्य संस्थेने देखील कौतुक केले आहे.
धारावी चे एकूण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या बघितली तर ती अतिशय दाट लोकवस्ती मध्ये गणली जाते. तब्बल २.५ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या भागात जवळपास ६.५ लाख लोकं वास्तव्य करत आहेत. असा असताना देखील कोविड -१९ वर नियंत्रण मिळवण्या मध्ये धारावी ही यशस्वी ठरली आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी मुंबईतील या ‘धारावी मॉडेल’ची स्तुती केली आहे. “केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो,” असे टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि धारावी (मुंबई) जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याची काही उदाहरणं आहेत. सर्वांना सामील करणं, चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणं, त्यांचं अलगिकरण करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि करोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे.”
यावेळी त्यांनी कोरोनाचे संकट यशस्वीपणे परतवून लावणाऱ्या जगातील काही भागांचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, व्हिएतनाम, कंबोडिया, न्यूझीलंड, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया, तसेच अत्यंत दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या मुंबईतील धारावी परिसरात सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेशन आणि आजारी लोकांवर उपचार हेच कोरोनाची साखळी तोडण्याचे मार्ग आहेत. जगभरात अशी आणखी अनेक उदाहरणे सापडतील. यावरुन एकच सिद्ध होते की, कोरोनाचा प्रादुर्भाव कितीही तीव्र असला तरी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे घेब्रेयसिस यांनी म्हटले.
न्यूज अनकट प्रतिनिधी