राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर दौऱ्याबाबत जिल्हा प्रशासनाने घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

7

नागपूर, १ जुलै २०२३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ४ ते ६ जुलै दरम्यान प्रस्तावित नागपूर दौऱ्याबाबत, जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी विमानतळ, राजभवन आणि कोराडी मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. राष्ट्रपती मुर्मू पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत, त्यामुळे आवश्यक ती सर्व व्यवस्था तयार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

या भेटीदरम्यान राष्ट्रपतींचे आरोग्य आणि वाहतूक सुरक्षेवर भर देण्यात आलीय. ५ जुलै रोजी शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये, महालक्ष्मी जगदंबा देवी दर्शन, सांस्कृतिक केंद्राची पाहणी, कोराडी मंदिर परिसरात सार्वजनिक समर्पण आदी कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होणार आहेत. यासोबतच त्या मंदिराच्या अन्नछत्र सभागृहात नागरिकांना संबोधित करतील.

तपासणीदरम्यान काही कडक सूचनाही आयोजकांना देण्यात आल्या. त्यामध्ये कार्यक्रमस्थळी २ प्रवेशद्वार करण्यात यावेत, यातील एक गेट व्हीआयपी अभ्यागत, प्रेस आणि इतरांसाठी असेल. त्यामुळे संबंधितांना नियोजित वेळेपूर्वी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. कार्यक्रमाला येणाऱ्यांच्या वाहनांसाठी मंदिरात नियमित पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात आलीय.

कार्यक्रमस्थळी अन्न आणि पाण्याच्या बाटल्या किंवा इतर वस्तू आणण्यास मनाई आहे. यावेळी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर (विशेष शाखा), डीसीपी अर्चित चांडक (आर्थिक गुन्हे शाखा), अनुराग जैन (परिमंडळ) तसेच विमानतळ प्राधिकरण, राजभवन, महसूल प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड