मुंबई, २३ मार्च २०२१: अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर राज्यात राजकीय वादळ उठले आहे. त्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रातून विरोधी पक्ष राज्य सरकारवर चांगलाच आक्रमक झालेला दिसत आहे. परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते त्यानंतर भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र दिल्लीत झालेल्या शरद पवार यांच्या बैठकीत अनिल देशमुख यांच्या पाठीशी ठाकरे सरकार तसेच राष्ट्रवादी असल्याचे दिसून आले. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचे एक ट्वीट रिट्वीट करत पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता फडणवीसांसह भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवारांची फेसबुक पोस्ट –
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं.
‘विरोधी पक्ष सत्तेसाठी उतावीळ’
गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी ४ नोव्हेंबर २०२० रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं.
‘सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं’
एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलू लागते, म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे. हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? आज हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे. हा सगळा प्रकार आणि गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता मार्क ट्वेनच्या ‘सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं’, या वाक्याची प्रचिती येते आणि हा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न असल्याचा दाट संशय येतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे