सासवडहून संत सोपानकाका व संत चांगावटेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूकडे रवाना 

पुरंदर, दि. १ जुलै २०२०: सासवड येथील संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून मंगळवारी ( दि ३० ) दुपारी २ वा. ताल मृदूंगाच्या गजरात, हरिनामाच्या  जयघोषत आणि मोजक्या २० भाविकांसह संत सोपानकाका महाराजांच्या चल पादुका श्री क्षेत्र पंढरपूर एसटी बसने रवाना झाल्या. या पाठोपाठ येथील संत चांगावटेश्वर महाराजांच्याही पादुकांचे मोजक्या १० भाविकांसह उत्साही वातावरणात पंढरपुरकडे प्रस्थान झाले.

काल मंगळवारी सकाळी देऊळवाड्यात दैनंदिन विधी होऊन दुपारी २ वा प्रस्थानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रस्थानाचे अभंग, आरती होऊन एक मंदिर प्रदक्षिणा होऊन संत सोपनकाकांच्या पादुका देऊळवाड्यातून बाहेर पडल्या. ट्रस्टचे अध्यक्ष गोपाळ गोसावी यांनी पादुका एसटी बसमध्ये ठेवल्या. यावेळी टाळमृदूंगाचा आणि हरिनामाचा गजर झाला. संत सोपानकाका सहकारी बँकेच्यावतीने फुलांची आकर्षक सजावट केलेल्या एसटी बसमधून हा सोहळा पंढरपूकडे मार्गस्थ झाला.

सोबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.  प्रस्थानसमयी आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, नायब तहसीलदार उत्तम बढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, एसटी आगार प्रमुख मनीषा इनामके तसेच संत सोपानदेव ट्रस्टचे अध्यक्ष हभप गोपाळ गोसावी, सोहळाप्रमुख श्रीकांत गोसावी, पोलीस स्टेशन आणि महसुलचे कर्मचारी उपस्थित होते.

संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांसह जाणा-या २० लोकांची कोरोना चाचणी केली आहे. यामध्ये दोन विश्वस्त, दोन चपोदार, दोन मानकरी, दोन टाळकरी, चवरी आणि छत्रीचे प्रत्येकी एक मानकरी, रथापुढील क्रमांक १ च्या दिंडीचे प्रमुख आणि उर्वरित सेवेकरी असे २० जणांचा यात समावेश आहे. सोहळ्यासोबत प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड, पोलीस अधिकारी राहुल घुगे असणार आहेत. दरम्यान मंगळवारी  रात्री हा सोहळा थेट पंढरपूरमध्ये पोहचणार आहे. तेथे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमानंतर हा सोहळा आषाढ शुद्ध व्दादशीला ( दि २ जुलै ) सायंकाळी सासवड मुक्कामी पोहोचेल असे अध्यक्ष गोपाळ गोसावी यांनी सांगितले. दरम्यान, संत सोपानकाकांच्या पाठोपाठ येथील संत चांगावटेश्वर महाराजांच्या पादुकाही अभंग, आरती होऊन एसटी बसमधून पंढरपूरकडे मार्गस्त झाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा