संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यातील वाद वाढला; खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांना पाठविली मानहानीची नोटीस

मुंबई, ३ फेब्रुवारी २०२३ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. नारायण राणे यांनी १५ जानेवारीला दिलेल्या वक्तव्याबाबत संजय राऊत यांनी ही नोटीस पाठविली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांना राज्यसभेचे खासदार बनविण्यासाठी पैसा खर्च केल्याचे नारायण राणे म्हणाले होते. ते संजय राऊत यांच्या अर्जासाठी गेले तेव्हा मतदार यादीत संजय राऊत यांचे नावही नव्हते.

आता नारायण राणे न्यायालयात संजय राऊत यांच्या नोटीसला कसे उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नारायण राणे यांनी १५ जानेवारी रोजी मुंबईतील भांडुप परिसरात कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केले होते. संजय राऊत यांचे वकील सार्थक पी. शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार राणेंचे हे विधान संजय राऊत यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे असून, ते खोटेपणावर आधारित आहे.

संजय राऊत यांनी आज शुक्रवारी (ता. ३ फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांच्यासारखे लोक भाजपचे पोपटलाल आहेत. ते काहीही विचार न करता चुकीच्या पद्धतीने बोलतात. माझे नाव मतदार यादीत नव्हते, असे राणे म्हणतात. यापूर्वी मी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पंचवीस वेळा मतदान केले होते. माझे नाव मतदार यादीत नव्हते तर मतदान कसे केले? मी बांगलादेशी की पाकिस्तानी?

संजय राऊत पुढे म्हणाले, की राणेंनी मला खासदार केले, तर बाळासाहेब ठाकरे कोण होते? शिवसेनाप्रमुखांनी मला खासदार केले. नारायण राणेंनाही मुख्यमंत्री बाळासाहेबांनीच केले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सर्व पदे दिली. नारायण राणेंना त्यांच्या खोट्या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागणार आहे. शिवसेनेचे सर्व नेते त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा