नवी दिल्ली, 18 जून 2022: अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी तरुण रस्त्यावर आणि रेल्वे मार्गावर उतरले आहेत. देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान आता संरक्षण मंत्रालयानेही अग्निवीरांबाबत मोठी घोषणा केली आहे. संरक्षण मंत्रालयाने अग्निवीरांना त्यांच्या मंत्रालयांतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.
गृह मंत्रालय ने CAPFs और असम राइफल्स में होने वाली भर्तियों में अग्निपथ योजना के अंतर्गत 4 साल पूरा करने वाले अग्निवीरों के लिए 10% रिक्तियों को आरक्षित करने का महत्वपूर्ण निर्णय लिया है।
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) June 18, 2022
संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंत्रालयातील भरतीमध्ये अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
अग्निवीरांसाठी विभागाकडून कोणत्या भरती करण्यात येणार आहेत, त्यात आरक्षणाची व्यवस्था केली जाईल, असेही संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अग्निवीरांना भारतीय तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदांसह संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या 16 कंपन्यांमध्ये नियुक्तींमध्ये आरक्षण दिले जाईल.
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक उपक्रमांना अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षणाची प्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यास सांगितले जाईल. यापूर्वी, गृह मंत्रालयाने अग्निवीरांना त्यांच्या विभागातील नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षणाची प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती.
गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले की अग्निपथ योजनेंतर्गत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये चार वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली होती. पहिल्या तुकडीच्या अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात येईल, असेही गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. यानंतर अग्निवीरांसाठी कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट दिली जाईल.
देशभरात निदर्शने
अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बिहार-बंगालपासून तेलंगणापर्यंत अग्निपथविरोधात आंदोलन सुरू आहे. बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी हिंसक निदर्शने झाली. आंदोलकांनी मसौधीमध्ये रेल्वे स्टेशन जाळले, तर यूपीच्या जौनपूरमध्ये रोडवेजची बस पेटवली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे