बेनापोल- बांग्लादेश, २७ जुलै २०२० : एफएमसीजी उत्पादने व इतर वस्तू घेऊन जाणारी भारतातील प्रथम कंटेनर ट्रेन आज बांगलादेशच्या बेनापोल रेल्वे स्थानकात पोहचली. शुक्रवारी कोलकाताजवळील मजेरहाट स्थानकामधून साबण, शैम्पू व इतर एफएमसीजी वस्तू आणि कपड्यांच्या ५० कंटेनरच्या वस्तूंनी सहित ही रेल्वे निघाली होती.
भारतीय उच्चायोगातील रेल्वे सल्लागार अनिता बारिक यांनी ढाका येथील आकाशवाणीच्या विशेष बातमीदारास सांगितले की कंटेनर ट्रेन सेवा ही नियमितपणे सेवा देण्यासाठी भारतीय रेल्वे नेटवर्कच्या विविध टर्मिनल्सशी बांगलादेशला जोडेल. ते कॉनकोर इंडियाचे नामित टर्मिनल बांगलादेशातील बेनापोल, जेसोर, सिंगिया, नोआपारा आणि बंगबंधू सेतू पश्चिम रेल्वे स्थानकांकरिता विविध स्थानकांना जोडतील.
कंटेनर ट्रेनचे आगमन ही २०१७ मध्ये सुरू झालेल्या प्रक्रियेची परिणती आहे जेव्हा कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बांग्लादेश कंटेनर कंपनी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला, तेंव्हा कोलकाता ते बंगबंधुसेतू पश्चिम स्टेशन (बीबीडब्ल्यू) साठी प्रथम कंटेनर ट्रेनची चाचणी एप्रिल २०१८ मध्ये झाली होती.
भारत आणि बांगलादेश हे गेल्या काही वर्षात रेल्वेमधील सहकार्यात सुधारणा करीत आहेत. तथापि, गेल्या काही महिन्यांत कोरोना या साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावाने सर्व देशभर झालेल्या परिणामांमुळे दोन्ही देशांमधील पुरवठा साखळीवरही याचा परिणाम झाला होता, तेव्हा दोन्ही देशांमधील पुरवठा साखळी अखंड ठेवण्यासाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले.
तत्पूर्वी, १३ जुलै रोजी आंध्र प्रदेशहून मिरची घेऊन जाणारी पार्सल ट्रेन बांगलादेशात दाखल झाली होती. जूनमध्ये दोन्ही देशांमध्ये साखर, मका, मसाले आणि तयार वस्तू अशा अत्यावश्यक वस्तू वाहून नेणा-या १०० हून अधिक मालवाहू गाड्या चालविण्यात आल्या.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज ट्विट केले की, भारतीय रेल्वे सेवांचा वापर करून बरेली येथून बांगलादेशात ५१ ट्रकची खेप निर्यात केली गेली आहे.
आकाशवाणीच्या बातमीदारांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाची साथ असूनही भारत आणि बांगलादेश दरम्यान पुरवठा साखळी राखण्यासाठी भारतीय रेल्वेने अलीकडे कित्येक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. कंटेनर ट्रेन सेवा सुरू करणे या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे. रेल्वे जोडणीचे सातत्याने उन्नयन केल्याने भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर संबंधांना महत्त्व प्राप्त होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी