मुंबईसाठी पहिली ऑक्सिजन एक्‍सप्रेस कळंबोलीत दाखल

मुंबई, २७ एप्रिल २०२१: लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) ने भरलेले तीन टँकर घेऊन रो-रो सेवा २५ एप्रिल, २०२१ रोजी संध्याकाळी ६.०३ वाजता गुजरातमधील हापा येथून निघाली आणि २६ एप्रिल, २०२१ रोजी सकाळी ११.२५ वाजता महाराष्ट्रातील कळंबोली’ला पोहोचली. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या जलद वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर देण्यात आला होता. रेल्वे मंत्रालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांद्वारे देशभरातील कोविड-१९ रूग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेसने आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी ८६० किलोमीटरचा प्रवास केला आहे. या टँकरमध्ये अंदाजे ४४ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरलेला आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या सुरळीत वाहतुकीसाठी कळंबोली कारशेड येथे आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस हापा येथून विरंगम, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वसई रोड आणि भिवंडी रोड मार्गे सुरक्षेचे सर्व निकष पाळत कळंबोलीला पोहोचली आहे. जामनगरमधील मेसर्स रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या ऑक्सिजन टँकरचा पुरवठा करण्यात आलाय.

रेल्वेनं आतापर्यंत मुंबई ते विशाखापट्टणम मार्गे नागपूर ते नाशिक आणि लखनौ ते बोकारो आणि परत अशी ऑक्सिजन एक्सप्रेस चालविली असून २५/४/२०२१ पर्यंत सुमारे १५० टन लिक्विड ऑक्सिजन आणला आहे. अशा प्रकारच्या आणखी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ देशाच्या विविध भागात चालवणं नियोजित आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा