नगर ते बीड पहिल्या टप्प्यातील रेल्वे सुरु होण्याच्या अशा पल्लवीत

बीड, दि.३१ मे २०२० : अहमदनगर-बीड- परळी रेल्वेमार्गाच्या सर्वात मोठ्या पुलावरील स्टील गर्डरच्या कामाला सुरुवात झाली आहे. मेहकारी नदीवर हा पूल असून त्याला मेहकरी ब्रिज म्हणतात. रेल्वेचं काम असं सुरु असलं की बीड जिल्हावासीयांना वेगळा हुरुप येतो.

२०१४ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगर-बीड- परळी या रेल्वेमार्गाच्या कामासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नगर ते बीड या मार्गावरील मातीकाम आणि छोट्या पुलांची कामे पूर्ण झालेली आहेत. बीड ते परळी या अंतरातील भुसंपादनाचे कामही पूर्ण झालेले असून वडवणीपर्यंतचे मातीकाम प्रगतीपथावर आहे.

आता या रेल्वेमार्गाच्या कामाचा पुढचा टप्पा म्हणून नगर येथून २९ मे पासून स्टील कामाच्या कन्स्ट्रक्शन युनिटला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेमधील सर्वात मोठा पूल असलेल्या मेहकरी ब्रीजवर स्टील गर्डर टाकण्यात येत आहे.

अहमदनगरपासून अंदाजे ४० किलोमीटर अंतरावर हे काम सुरु आहे. त्यामुळे नगर ते बीड हा पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्ग लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोविड -१९ संबंधित सर्व सुरक्षा व खबरदारी घेत या पुलाचे काम करण्यात येत आहे. सध्या या पुलाच्या कामासाठी ६० मजूर काम करत असून २०२१ पर्यंत हा पूल पूर्ण होईल. बीड ते नगर या मार्गाला जोडणारा हा महत्वाचा पूल असल्याचेे रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा