वेनिस, ३ सप्टेंबर २०२० : जगभरातील कोरोना टाळेबंदीच्या नंतर जगभरातील चित्रपट रसिकांना काहीसा दिलासा देणारा वेनिस चित्रपट महोत्सव कडक सुरक्षेच्या उपायांसह काल सुरु झाला. इटालियन दिग्दर्शक डॅनियेल लुशेट्टी यांच्या लच्ची या उद्घाटनपर चित्रपटाला प्रेक्षागृहातील निम्मीच आसने भरली होती, त्यात वार्ताहरांची संख्याच अधिक होती.
गोल्डन लायन या प्रतिष्ठेच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी या महोत्सवाच्या मुख्य स्पर्धेत १८ चित्रपट आहेत. त्यात चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित द डिसायपल या चित्रपटाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध असल्याने नेहमीपेक्षा निम्मेच म्हणजे ६ हजार लोक या महोत्सवात हजेरी लावतील. जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रद्दे झाले असताना वेनिस महोत्सव भरवण्याचा ठाम निर्णय आयोजकांनी मे महिन्यातच घेतला होता.
इटली आणि शेजारील युरोपिय देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना देखील १२ सप्टेंबरपर्यंत हा महोत्सव सुरक्षितपणे पार पडेल अशी आशा आयोजकांना वाटते आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी