राज्यात सोमवारपासून थंडीचा जोर वाढणार

पुणे, १५ डिसेंबर २०२२ : मंदौस चक्रीवादळामुळे ढगाळ झालेले पुण्यासह राज्यातील वातावरण गुरुवारनंतर निवळण्याची शक्यता असून, सोमवारपासून (ता. १९) पुन्हा एकदा थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

ढगाळ वातावरणामुळे शहरातील थंडी गायब झाली असून, बुधवारी सरासरी किमान तापमान १८.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली किनाऱ्यापासून दूर जात असून, पुण्यासह राज्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानातील वाढ कायम आहे. गुरुवारपासून मुख्यत: कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कायम असून, राजस्थानमधील चुरू येथे बुधवारी देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.५ अंश सेल्सिअस होते. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २६ अंशांच्या दरम्यान होते.

कमी दाबाचे क्षेत्र होतेय तीव्र
पूर्व मध्य बंगालच्या अरबी समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याला लागून चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, ही प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर जात आहे, तर दक्षिण अंदमान समुद्रात सुमात्रा बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या वाऱ्याच्या प्रभावामुळे आज कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा